मुंबई: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीला सुरूवात झाली असून त्याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागलं आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा होणार असून त्या पदावर शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. याला कारण म्हणजे या बैठकीतील आसन व्यवस्था. शरद पवारांच्या शेजारी शशिकांत शिंदे बसल्याने त्यांच्या नावाची औपचारिकता बाकी असल्याचीही चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज बैठक पार पडत आहे. या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात येणार आहे. सध्या या पदावर जयंत पाटील आहेत. आता या पदावर शशिकांत शिंदे यांनी निवड होणार असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा सुरू आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. या आधीच्या एका कार्यक्रमात त्यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावे आणि नव्या लोकांना संधी द्यावी अशी जाहीर मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चाही सुरू झाली.

शरद पवार भाकरी फिरवणार

दोन दिवसांपूर्वी, जयंत पाटलांनी राजीनामा दिला अशा चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांना संधी मिळणार अशीही चर्चा सुरू झाली. मात्र प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय हा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत होणार असल्याने आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला भरभरून यश मिळालं. पण त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर पक्षाच्या कार्यकारिणीत बदल करावा अशी मागणी सुरू झाली होती. त्यामुळेच आता शरद पवार भाकरी फिरवणार असल्याची चर्चा सुरू आहे.

भाजपमध्ये जाणार नाही, जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यावर खुद्द जयंत पाटलांनीच स्पष्टीकरण दिलं. आपण शरद पवारांसोबतच असून कुठेही जाणार नाही. आपण भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात असल्याचंही ते म्हणाले.