Abhijit Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन पुन्हा एकदा वातावरण गरम झालं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. उद्यापासून त्यांचं मुंबईतील आझाद मौदानावर उपोषण सुरु होणार आहे. यासाठी मराठा समाजाचे लाखो लोक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे नेते देखील या आंदोलनात सामील होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माझा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील हे देखील आपल्या समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी सर्व कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील हे आज आपल्या समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले आहेत. आपण निवडून आल्यानंतर पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी विधानसभेत केली होती. याची आठवण करुन देत तीन महिन्यापासून जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम देऊनही त्यांचे न ऐकल्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राचा मराठा समाजाचा महासागर मुंबईकडे रवाना झाल्याचे पाटील यांनी सांगितले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी तातडीने विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी ही आमदार पाटील यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी सर्व कार्यकर्त्यांसह आपण मुंबईकडे निघाल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अटीशर्तींसह परवानगी
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मुंबईतल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी अटीशर्तींसह परवानगी दिली आहे. वास्तविक मुंबईत पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मनोज जरांगेना मनाई केली होती. पण मराठा आरक्षणासाठी मुंबईत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार करून मनोज जरांगे आज अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यांना मुंबईच्या वाटेवर असताना राज्य सरकारकडून परवानगीचं सरप्राईज गिफ्ट मिळालं. अर्थात ही परवानगी फक्त 29 ऑगस्टला एका दिवसाच्या आंदोलनाची आहे. त्यासाठी आझाद मैदानात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेची मुभा देण्यात आली आहे.
प्रकाश सोळंके – आमदार, माजलगाव (राष्ट्रवादी काँग्रेस) (prakash solanke)
माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केल्यानंतर, सोळंके यांनी देखील या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे जाहीर केले.
संदीप क्षीरसागर – आमदार, बीड विधानसभा (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट) (Sandeep Kshirsagar)
बीड हा मराठाबहुल विधानसभा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरही आंदोलनात सहभागी होण्यासाठी लोकांचा मोठ्या प्रमाणात रेटा होता. त्यांनी सुरुवातीपासूनच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, अलीकडेच त्यांनीही “चलो मुंबई” असा नारा दिला आहे.
बजरंग सोनवणे – खासदार, बीड लोकसभा (राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार गट) (Bajrang Sonwane)
खासदार बजरंग सोनवणे हे नेहमीच असे म्हणतात की, ते मनोज जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यामुळे खासदार झाले आहेत. आरक्षणासाठी जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिल्यानंतर सोनवणे यांनीही धडाडीने आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
विजयसिंह पंडित – आमदार, गेवराई (राष्ट्रवादी काँग्रेस) (Vijaysinh Pandit)
बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांनी आठवडाभरापूर्वीच सोशल मीडियावर “चलो मुंबई” असा नारा देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. याशिवाय, त्यांनी मतदारसंघातील विविध भागांमध्ये भव्य पोस्टर्स लावून नागरिकांना मुंबईकडे जाण्याचे आवाहन केले.
ओमराजे निंबाळकर – खासदार, धाराशिव लोकसभा (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Omraje Nimbalkar)
धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुक पोस्ट करत सरकारने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला स्पष्टपणे पाठिंबा दर्शवला आहे.
कैलास पाटील – आमदार, धाराशिव-कळंब विधानसभा (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Kailas Patil)
आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे मतदारसंघातील जनतेला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
संजय ऊर्फ बंडू जाधव – खासदार, परभणी लोकसभा (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) (Sanjay Jadhav)
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सरकारविरोधात हल्लाबोल केला असून, मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.