Pune : गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. शरद पवार यांनी याबाबतचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे घेतील असंही वक्तव्य केलं होतं. सातत्यानं विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येत आहेत. दोघांमध्ये संवाद देखील या ठिकाणी होत असल्याचे दिसत आहे. आजही पुण्यातील साखर संकुलात शरद पवार आणि अजित पवार एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा येत्या 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत. एकत्र येण्याचं नेमकं कारण काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक येत्या 9 तारखेला पार पडणार
येत्या 9 जून रोजी शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक येत्या 9 तारखेला पार पडणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने राज्यातून सर्व साखर कारखान्याचे प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. साखरेच्या उत्पादनात AI तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करता येईल याबाबत प्रत्यक्षिके देखील यावेळी दाखवली जाणार आहेत. पायलट प्रोजेक्टबद्दल सुद्धा या कार्यक्रमातून साखर कारखान्याच्या मालकांना माहिती दिली जाणार आहे.
कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना काय फायदा होईल याबाबत चर्चा
आजच पुण्यात साखर संकुलात महत्त्वाची बैठक पार पडली आहे. कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना काय फायदा होईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला अजित पवार, शरद पवार यांच्यासह मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासह इतर नेतेदेखील उपस्थित होते. पण या बैठकीची टायमिंग महत्त्वाचं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीत आपल्या पक्षाला सर्वाधिक यश मिळावं, यासाठी प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. विशेष म्हणजे या निवडणुकांआधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. उपमुख्मंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष महाविकास आघाडीत आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं. पण शरद पवारांच्या पक्षाला अपेक्षित यश मिळालं नाही. यानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.