पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांचे कौतुक केले आहे. "गौतम अदानी यांनी शुन्यातून सुरुवात केली असून आता देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.  


जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी शरद पवार यांच्या हस्ते ‘प्राईड ऑफ पुणे’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 


शरद पवार म्हणाले, "एकेकाळी बिर्ला आणि टाटा यांचा श्रीमंतांच्या यादीत समावेश होता. आता त्यांची जागा बदलली आहे. आता आठवडाभरापासून मी एका जैन माणसाबद्दल वाचतोय जो देशातील सर्वात श्रीमंत माणूस बनला आहे. हा माणून आहे गौतम अदानी. अदानी माझे चांगले मित्र असून त्यांनी अगदी शून्यातून सुरुवात केली आहे. आता विमानातून कुठेही गेले तरी अदानी यांचंच विमानतळ वापरावं लागतं. जवळपास 70 टक्के विमानतळ अदानी यांच्या मालकीचे आहेत. 


"पायाभूत सुविधा हा विकासाचा आधार असून या क्षेत्रात अदानी यांचे मोठे योगदान आहे. हे योगदान केवळ अदानी समूहाचे नाही तर देशासाठी आहे. देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या लोकांना आपण विसरू शकत नाही. गौतम अदाणी हे देशाला पुढे घेऊन जात आहेत. विमानसेवा, परदेशात आयात-निर्यात, पायाभूत सुविधा या क्षेत्रात ते चांगले काम करत आहेत,  असे कौतुक शरद पवार यांनी यावेळी केले. 


 123 अब्ज डॉलर संपत्ती
गौतम अदानी सातत्याने यशाची शिडी चढत आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, अदानी 123 अब्ज डॉलर संपत्तीसह पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत. वॉरेन बफे 121.7 अब्ज डॉलर संपत्तीसह सहाव्या स्थानावर घसरले आहेत. आदी ते पाचव्या क्रमांकावर होते.  अदानी यांच्या पुढे जगातील सर्वात श्रीमंत एलोन मस्क, अॅमेझॉनचे जेफ बेझोस, बर्नार्ड अर्नॉल्ट आणि बिल गेट्स हे लोक आहेत. 


महत्वाच्या बातम्या


Sharad Pawar News : शरद पवार म्हणतात, लक्षातच येत नाही गिरीष बापट कुठेही उभे राहतात अन् निवडून येतात