नवी दिल्ली: राष्ट्रवादीतील अभूतपूर्व फूटीनंतर (NCP Crisis)  पक्षात दोन गट पडले आहे.  राष्ट्रवादीतील दोन्ही गटात कायदेशीर लढाई सुरू आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि घड्याळ चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगात आजपासून डे टू डे सुनावणी होणार आहे.अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) आजपासून बाजू मांडण्यात येणार आहे. त्यामुळं आता राष्ट्रवादी काकांना मिळणार की पुतण्याला?, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पुढचे काही दिवस सुनावणी सलग होऊन आयोग निकाल राखून ठेवण्याची शक्यता आहे. दरम्यान शरद पवार आज दिल्लीत (Sharad Pawar In Delhi) आहेत. त्यामुळे सुनावणीवेळी ते उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची यासंदर्भात आज (20 नोव्हेंबर) दुपारी चार वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये निवडणूक आयोग राष्ट्रवादी नेमकी कोणाची याबाबत दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेणार आहे. या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोग जो शिवसेनेला न्याय तो राष्ट्रवादीला न्याय अशा अनुषंगाने निर्णय देणार की शरद पवार यांनाच राष्ट्रवादी पक्ष मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रसह देशाचे लक्ष लागलं आहे. अजित पवार गटाकडून सुमारे 20 हजार बोगस शपथपत्रकं दाखल करण्यात आल्याचा आरोप मागील सुनावणीत शरद पवार गटाने केला होता. तर पवार गटाकडून वेळकाढूपणा सुरु असल्याचा आरोप केला. अजित पवार गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला असल्याने आजही शरद पवार गटाकडून युक्तिवाद होईल.


शरद पवार सुनावणीसाठी उपस्थित राहणार


अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार गटाने पक्षावर दावा केल्यामुळे शरद पवार गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचलं आहे. या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 


निवडणूक आयोगात आज घमासान


गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत. तर शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत बाजू मांडत आहेत. गेल्या सुनावणीमुळे अजित पवार गटाकडून पी.ए. संगमा, सादिक अली या दोन्ही केसचा दाखला देण्यात आला होता. यासोबतच शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निकालाचाही उल्लेख वारंवार केला होता.