सातारा:  राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या गाडीला रविवारी अपघात झाला. या अपघातात आमदार शिंदे किरकोळ जखमी झाले. दरीच्या टोकावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. मात्र दरीच्या कडेला असलेल्या झाडांमध्ये गाडी अडकली आणि त्याचवेळी आमदारांनी गाडीतून उडी मारल्याने मोठी दुर्घटना टळली.


आंधारी फाटा (ता. जावळी) इथं ही घटना घडली. रात्री उशीरा गाडी दरीतून बाहेर काढण्यात आली.

आमदार शशिकांत शिंदे हे महाबळेश्‍वर तालुक्‍यातील शेवटचं गाव असलेल्या रामेघर इथं नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच सत्कार सोहळा आणि शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाला जात होते. या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र कार्यक्रमाला जाण्यास उशीर झाल्याने त्यांची फॉर्च्युनर गाडी सुसाट निघाली होती.

मात्र अंधारी फाट्याजवळील एका वळणावर रस्त्यावरील बारीक खडीवरुन, गाडीचं चाक घसरलं. गाडीचा वेग जास्त असल्याने, ब्रेक दाबूनही गाडीवर नियंत्रण मिळवता आलं नाही. त्यामुळे आमदार शिंदे ज्या बाजूला बसले होते, ती बाजू दरीच्या दिशेने गेली. मात्र त्याचवेळी दरीच्या टोकावर असलेल्या दोन झाडांच्या मध्ये ही गाडी अडकल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यानच्या काळात आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारली. यामुळे शशिकांत शिंदे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.