NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात (NCP MLA Disqualification Case) आज विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीस सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. आपल्या साक्षी दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या पत्रावरच बोट ठेवलं आहे. अमेरिकेत असणारे आमदार आशुतोष पाटील (Ashutosh Patil) हे  त्या दिवशी आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्रावर सही कशी केली असा आमचा सवाल असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. 


आमदार अपात्रता सुनावणीच्या पहिल्याच दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी अनेक महत्त्वाचे गौप्यस्फोट केले. सुनावणी दरम्यान पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी झाल्या होत्या, असं उत्तर दिलं. पण त्याची कागदपत्रे आणि पुरावे एका बंद कपटात ठेवण्यात आले होते. मात्र ही कागदपत्रे गायब झाली असल्याचा दावा आव्हाड यांनी केला. पक्षांतर्गत निवडणूक झाली होती. मात्र  गोपनीय आणि महत्त्वाच्या कागदपत्रांच्या कपाटात हे कागदपत्र ठेवण्यात आली होती. याची जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले.संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत.त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचा काय केलं माहिती नाही असेही आव्हाड म्हटले. 


अमेरिकेतील आमदाराने कशी सही केली? 


जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवताना वकिलांनी  30 जूनची कागदपत्रे पाहिलीत का असा प्रश्न केला. त्यावर आव्हाड यांनी उत्तर देताना म्हटले की, 30 तारखेला अजित पवार गटाची जर महत्वाची बैठक झाली होती मग ती दाखवली का नाही? त्यांनी दाखवली नाही कारण त्यांना लक्षात आलं असतं की आपला पक्ष फुटला आहे. जर 30 तारखेला पाठिंब्यासाठी यांना आमदारांना सह्या दिल्या आहेत तर मग त्या दिवशी त्यांना पाठिंबा देणारा आमदार आशुतोष काळे ज्याने त्या पाठिंब्याच्या पत्रावर सही केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे तो आमदार तर त्यावेळी अमेरिकेत होता? मग त्या आमदाराने पाठिंब्याच्या पत्रावर सही केलीच कशी असा आमचा सवाल आहे असे आव्हाड यांनी म्हटले. 


विधीमंडळ सदस्य पक्षाच्या अध्यक्षाला कसे काढू शकतात?


आजच्या सुनावणीत जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातंर्गत निवडणुका झाल्याचे म्हटले. पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचाच एकमेव अर्ज आला होता. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. विधीमंडळाचे सदस्य  हे बैठक घेऊन अध्यक्षांना काढू शकत नाही. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेले पत्र हे फक्त सह्यांचे पत्र आहे. केवळ विधीमंडळ सदस्यांना हा अध्यक्षांना काढण्याचा अधिकार नाही असेही आव्हाड यांनी म्हटले.