मुंबई: विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवारांची वर्णी लागण्याची शक्यता असून त्यांच्या नावाची उद्या सकाळी घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांनी आमदारांच्या बोलावलेल्या बैठकीत जवळपास सर्वच आमदारांनी अजित पवारांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आली आहे. 


आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. तर उद्या एकनाथ शिंदे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांनी सुरुवातीला राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. यामध्ये आमदारांनी अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त करावे असा प्रस्ताव शरद पवारांच्या समोर ठेवला. आमदारांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा नेत्यांची बैठक घेतली. त्यामध्ये राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, हसन मुश्रीफ, अजित पवार, धनंजय मुंडे उपस्थित होते. त्यानंतर अजित पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.


राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी अजित पवार, जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा होती. त्यानंतर आमदारांनी अजित पवारांच्या नावाला पसंती दिली असल्याची माहिती आहे.


दरम्यान, आजच्या या बैठकीमध्ये शरद पवारांनी आमदारांना मार्गदर्शन करताना चार मुद्दे मांडल्याची माहिती आहे.


1) राज्यांतील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा.


2) विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या.


3) शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना पाहायला मिळेल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे.


4) सरकार पडलं तर मध्यावधी निवडणुका लागतील, त्यामुळे त्याची तयारी आत्तापासून करा.


महत्त्वाच्या बातम्या: