मुंबई : आम्ही वर्तक नगर ठाण्यात तक्रार दिली. परंतु आमची तक्रार घेण्यात आली नाही. माझ्या आणि पतीच्या जीवाला धोका असल्याचे पोलिसांना सांगून देखील आम्हाला सुरक्षा देण्यात आलेली नाही. याला काय म्हणायचं? आमची जबाबदारी कोणी घ्यायची? असा हताश सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awad ) यांची कन्या नताशा आव्हाड यांनी आज उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाते मात्र, आमची साधी तक्रार देखील दाखल करून घेतली जात नाही. या घटनेनंतर माझ्या कुटुंबाला धक्का बसला असल्याचे नताशा आव्हाड यांनी म्हटले. राजकारणाशी कोणताही संबंध नसताना आम्हाला त्रास दिला जातोय. आम्हाला टार्गेट केलं जातंय, असा आरोपही नताशा आव्हाड (Natasha Awad ) यांनी केला आहे.


जितेंद्र आव्हाड यांचे जावई आणि मुलीला शूटर पाठवून ठार करण्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यांनंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली होती. या प्रकरणी आव्हाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी आव्हाड यांच्या वकिलांनी अटक पूर्व जमीनसाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि कन्या नताशा आव्हाड यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  


"ठाणे पोलिसांचा मी लाडका दिसतोय, चित्रपटावेळी माझा संबंध नव्हता, विनयभंगावेळी माझा संबंध नव्हता, आताही माझा संबंध नव्हता, तरी देखील खोटं काहीही सांगून कार्यकर्ते आणि माझ्याविरोधत तक्रार दाखल केली आहे. मला घाबरवण्यासाठी हे सर्व करत असाल तर मी वाकणार नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले. पैसे मोजतानाचे व्हिडीओ लोकांनी शेअर केले आहेत. महेश आहेर यांच्या पदवीबाबत अनेकांनी तक्रार केली आहे. तरी देखील कोणतीही कारवाई होत नाही. त्यांचं शिक्षण कमी असताना त्यांना प्रमोशन कसं मिळालं? त्या क्लिपमधील आवाज महेश आहेर यांचा नाही असाच फॉरेन्सीक लॅबचा अहवाल देणार आहे. कारण सत्तेत कोण बसलं आहे हे सर्वांना माहिती आहे, असे आव्हाड यांनी म्हटले. 35 वर्षाच्या राजकारणात एवढे घाणेरडे प्रकार घडले नाहीत. महेश आहेरला प्रति स्केअर फुटानं लाच मिळायची. हा कोणाचा जावई आहे, इतके पुरावे, इतके व्हिडिओ दिले तरी कोणतीच कारवाई होत नाही, असा आरोप यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. 


"देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री होते, पण मला आठवत नाही त्यांच्या काळात असे कुठे सुडाचे राजकारण झाले नाही. हे मी तेव्हा पण बोलायचो आता पण बोलतोय. पण जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर आताच्या मुख्यमंत्र्यांना विचारले जाते, त्यांच्या परवानगी शिवाय माझ्यावर गुन्हे दाखल होऊच शकत नाहीत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. 


अन् आनंद दिघे यांना सुरक्षा मिळाली


'1999 ला आमची सत्ता आली त्यावेळी आनंद दिघे यांची सुरक्षा काढली होती, पण माझ्या घरी पद्म सिंह पाटील आले तेव्हा मी आनंद दिघे यांना घरी यायला सांगितले. दिघे यांनी पाटील यांना सांगितले की मला गरज आहे, तेव्हा पाटील यांनी सांगितले काही काळजी करू नका उद्या पासून सगळे ठीक होईल. त्यानंतर त्यांना सुरक्षा देण्यात आली, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यावेळी दिली.