Jayant Patil on State Govt : मराठवाड्यामध्ये (Marathwada) दुष्काळी परिस्थितीमुळे खरीपाची पिकं हातातून गेली आहेत. त्यामुळं सरकारनं मराठवाड्यात दुष्काळ जाहीर केला पाहिजे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं. सरकारनं इव्हेंट कमी करावा आणि बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकाव्यात असेही जयंत पाटील म्हणाले.


मराठवाड्यासाठी सरकार काय जाहीर करणार 


सरकारनं शेतकऱ्यांना मदत सुरु केली पाहिजे. पण सरकार दुसऱ्यात कामात व्यस्त आहे. बडेजाव सुरु आहे, सरकार किती मदत करणार की नुसत्या घोषणा करणार हे बघायला हवे. मराठवाड्यात आज बैठक आहे. मराठवाड्यासाठी सरकार काय जाहीर करणार हे बघायला पाहिजे असे जयंत पाटील म्हणाले. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या जिल्हा बँका आर्थिकरीत्या सक्षम नाहीत. त्यामुळं शेतकरी त्रस्त आहेत. पुढची पिढी शेती करणार का? इतका गंभीर प्रश्न असल्याचे जयंत पाटील म्हणाले.


मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या


मराठवाड्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्येचं प्रमाण आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्ह्यात 186 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची स्थिती आहे. याकडे राज्य सरकारनं गंभीरपणे पाहायला हवं असेही जयंत पाटील म्हणाले. इतर राज्यात, जिल्ह्यांमध्ये कामासाठी होणारे स्थलांतर अतिशय जास्त आहे. कोणताही मोठा उद्योग मराठवाड्यात आलेला नाही. त्यामुळं रोजगाराच्या बाबतीत इथल्या लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. छत्रपती संभाजीनगरला आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी पाटी आहे. पण विमान येतच नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. 


आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण करा


दुष्काळी परिस्थिती असताना आजच्या बैठकीला उत्सवाचं स्वरुप दिलं आहे. अति उत्साहात सरकार सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा निधी देणार अशी चर्चा माध्यमातून ऐकली. त्यांचे मी स्वागत करतो. आधी दिलेली आश्वासनं देखील पूर्ण केली जातील अशी आशा करतो असे जयंत पाटील म्हणाले.


मराठवाड्यात सरकारनं पाण्याचे टँकर जाहीर करावेत


मराठवाड्यात सरकारनं पाण्याचे टँकर आज जाहीर करणे आवश्यक आहे. धरणामध्ये पाणी साठा शिल्लक आहे असे वाटत नाही. सरकारनं लवकर जागं व्हावं. सरकार आपल्या दारी हे कार्यक्रम सोडून दुष्काळ आपल्या दारी आधी बघायला पाहिजे इव्हेंट कमी केला पाहिजे, बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत असे जयंत पाटील म्हणाले.  


बेरोजगारी ही मोठी समस्या 


आज बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. सरकारी नोकऱ्या पण कमी करणार असे जाहीर झाले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आता केल्या जाणार आहेत. त्यासाठी 9 कंपन्या नेमल्या आहेत. आरक्षणाचा विषय तर तसाच आहे. आरक्षणाचा आग्रह करणाऱ्या तरुणाला कळले की नोकऱ्या कंत्राटीवर भरणार आहेत, मग आरक्षणाचा काय उपयोग? असे जयंत पाटील म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्रात तरुणाची कुचंबणा होणार आहे. गुंतवणूक देखील येत नाहीत, सरकार त्यासाठी काही करत नसल्याचे पाटील म्हणाले.