जळगाव : आपल्याला ठाण्याला दाखल करण्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना बुधवार पेठेत पाठवायला हवे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले. एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. एकनाथ खडसे हे खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचे महाजन म्हणाले होते. यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या वाक्याचा अर्थ चुकीचा घेतला गेल्याचे खडसे म्हणालेत. गिरीश महाजन यांना कोरोना झाल्याने त्यांनी बुधवार पेठेतील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घ्यायला हवे. त्यांना चांगले आरोग्य, सुबुद्धी मिळावी यासाठी आपण त्यांना बुधवार पेठेत जाण्याचा विषय केला होता असे खडसे म्हणाले.


विकृत मनोवृत्तीचे विचार असल्याने त्यांना या ठिकाणी नवसाला पावणारा गणपती न दिसता अन्य गोष्टी दिसल्या असेही खडसे यावेळी म्हणाले. त्यामुळे मनी वसे ते स्वप्नी दिसे, जशी दृष्टी, तशी सृष्टी असा टोला खडसेंनी गिरीश महाजन यांना लगावला. गिरीश महाजन यांना बुधवार पेठेतील दगडूशेठ हलवाई गणपती पावेल अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या आहेत. एकनाथ खडसे यांच्या या शुभेच्छांमुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.


माझा दृष्टीकोन साफ होता. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी बुधुवार पेठेत जावे म्हणजे त्यांनी चांगली सुबुद्धी मिळेल, हाच माझा हेतू होता. बुधुवार पेठेत दगडूशेठ गणपतीचे एक श्रद्धास्थान आहे. तो नवसाला पावणारा गणपती आहे, अशी माझी भावना आहे. त्यामुळे गिरीश महाजन यांना दगडूशेठ गणपती पावेल अशी मी प्रार्थना करतो असे खडसे म्हणाले.


जळगाव जिल्ह्याच्या राजकरणात भाजपचे आमदार गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader) एकनाथ खडसे यांच्या वाद हा सर्वांना परिचीत आहे. दोन्ही नेते सध्या एकमेंकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत.  त्यामुळे त्यांच्यात पहिल्यांदाच वाद होत आहेत. गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे मराठा विद्या प्रसारक संस्था वादाच्या प्रकरणावरुन पोलिसांकडून महाजनांची चौकशी सुरू आहे. यावरुन एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोलिसांकडून महाजन यांचा तपाास सुरू असून  त्यांना भीतीपोटी कोरोना झाला का? असा सवाल खडसेंनी उपस्थित केला होता. एकनाथ खडसे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन यांनी म्हटले की, खडसेंना ट्रिटमेंटची गरज आहे. त्यामुळे त्यांना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवावे, अशी टीका महाजन यांनी केली होती.


महत्त्वाच्या बातम्या: