Ajit Pawar : अधिवेशन काळात पक्षाच्यावतीने विधानसभेत आक्रमक भूमिका मांडण्याचे काम निश्चितपणे होईल. जिथे सत्ताधारी चुकीचे असतील तिथे आवाज नक्कीच उठवू आणि जिथे योग्य असेल तिथे राजकारण करण्याची भूमिका घेणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते. 


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई इथे आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजित पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणं केली. पण आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन अजितंनी केले. राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची आपली तयारी असायला हवी. आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढाव्यात तसेच जिथे आपली ताकद जास्त असेल तिथे कोणाचीही मदत न घेता जागा लढवावी, असे अजित पवार म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास पंधरा वर्षे काँग्रेससोबत संसार केला. मात्र त्यातही काही ठिकाणी वेगळ्या निवडणुका लढवण्याची भूमिकाही घेतली. यातून केवळ समोरील विरोधकांचा पराभव झाला पाहिजे ही भूमिका होती. येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसकडून त्यांची भूमिका लवकरच मांडण्यात येईल. पण भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येऊन लढण्याची जिथे गरज असेल तिथे तशी भूमिका घ्यायची, असे ते म्हणाले.


आज पावसामुळे गडचिरोली येथे उद्भवलेली परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे राज्यात पावसाची परिस्थिती काय आहे यावर लक्ष ठेवून कुठे कुठे लोकांना मदतीची गरज आहे याकडे लक्ष ठेवावे. कुठे अडचण आली तर त्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सदैव धावून जाते हे कृतीतून आपण सर्वांनी दाखवायचे आहे, असेही अजित म्हणाले.


देशात बेरोजगारी आणि महागाई वाढत आहे. याविरोधात पक्षाच्या वतीने आंदोलनाची भूमिका आपण घ्यायला हवी. केंद्र सरकारकडून अन्नधान्य, डाळी, पीठ, दूग्धजन्य पदार्थ अशा जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी आकारण्यात येणार आहे. याचा फटका गरीब आणि मध्यमवर्गाला बसणार आहे. याविरोधात देखील आपल्याला आंदोलन करावे लागेल, अशी सूचना अजितंनी केली. तसेच विधिमंडळातील कार्यालयात सोमवार ते बुधवार आपण उपस्थित असणार असून इतर वेळी दौऱ्यानिमित्त बाहेर पडू, अशी माहिती त्यांनी दिली.