Deepak Kesarkar : शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या दीपक केसरकर यांच्यावर आता राष्ट्रवादीतून जोरदार टीका होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेत फूट पडली त्या प्रत्येक वेळी शरद पवार यांचा त्यात हात होता असा गंभीर आरोप केसरकर यांनी केला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र सोडले आहे.
खाजवून खरूज काढू नका, आव्हाडांनी सुनावले
अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात. 2014 ला मीच आलो होतो, साहेबांचा निरोप घेऊन जिथे आहात तिथे सुखी राहा. खाजवून खरूज काढू नका.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
केसरकरसाहेब सध्या तुम्ही हवेत आहात. पवारसाहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते, हे तुम्ही जाणुन आहात. तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही.
महेश तपासे यांची तोफ धडाडली -
दुर्दैवाने आज शिवसेनेतीलच काही बंडखोर आमदार त्याच भाजपसमोर लोटांगण घालत आहेत. आणि म्हणूनच माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वेदना होईल अशी कृती खऱ्या अर्थाने शिंदे गटाच्या माध्यमातून होत आहे, ज्यात आदरणीय पवार साहेबांचा काहीही संबंध नाही. वास्तविक, २०१९ मध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनीच सर्व शिवसैनिकांचा स्वाभिमान वाचविण्याचे कार्य केले होते. माननीय पवार साहेबांच्या प्रयत्नांतून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीमुळेच शिवसेनेला मुख्यमंत्री पद मिळाले याचा विसर दिपक केसरकर यांना पडला असावा, असे महेश तपासे म्हणाले.
केसरकर काय म्हणाले होते?
शिवसेना फुटीमध्ये शरद पवारांचा हात आहे. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या, हे शरद पवार यांनी जनतेला सांगावे असे केसरकर म्हणाले. शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितले असल्याचा दावा केसरकरांनी केला. नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती. मात्र, राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती असेही पवारांनी सांगितले होते, असा दावा केसरकरांनी केला. छगन भुजबळ यांना स्वत: च शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले असल्याचे केसरकर यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या पाठिशी शरद पवार यांचे आशीर्वाद होते असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.