मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांची शनिवारी (04 मे) मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या शिष्ठमंडळाने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी सरकारने पावले उचलावी, यासाठी निवेदनदेखील दिले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील भीषण दुष्काळी प्रश्नावर सरकारने लवकरात लवकर काम सुरु करावं आणि दुष्काळी भागातही काम सुरु करावे. यावेळी राष्ट्रवादीचे नते जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ उपस्थित होते

सध्या देशात सुरु असलेली लोकसभा निवडणूक, काही महिन्यात येऊ घातलेली विधानसभा निवडणूक आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती.

जयंत पाटील याबाबत म्हणाले की, शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन तयार केले. चारा छावणीसाठीचा निधी खूपच अपुरा पडत आहे. त्यामुळे जनावरांचे हाल होत आहेत.

पाटील म्हणाले की, आमच्या शिष्टमंडळाने या गोष्टीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. तसेच महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्याची सरकारने नुकसान भरपाई अद्याप दिलेली नही. सरकारने त्याचे पैसे लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.