Sharad Pawar On Jayant Patil ED: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची मुंबईत ईडी चौकशी सुरू असताना दुसरीकडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत भाजपवर टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 नेत्यांची आतापर्यंत तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग कसा सुरू आहे, हे राज्यातील जनतेने पाहिले असल्याचे पवार यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. तर, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर टीका केली.
राष्ट्रवादीच्या 10 नेत्यांची आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे. अनिल देशमुखांना नाहक तुरुंगवास घडला. अनिल देशमुख 13 महिने तुरुंगात होते. त्यांच्यावर आरोप झालेली 100 कोटींची रक्कम दीड कोटींवर आली. ही दीड कोटींची रक्कम शैक्षणिक संस्थेला देणगीची असून त्यांना नाहक बदनाम करत तुरुंगात डांबले असल्याचे पवार यांनी म्हटले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबीर सिंह यांच्याविरोधात कितीतरी तक्रारी दाखल आहेत. त्याची यंत्रणांनी नोंद घ्यावी असेही पवार यांनी म्हटले. राज्यात तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू असून हा गैरवापर कसा होतोय हे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले.
माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. त्यावरही पवार यांनी भाष्य केले. सीबीआयने चौकशी सुरू केल्यानंतर नवाब मलिक यांनी घेतलेली भूमिका सत्यावर आधारीत होती असे पवारांनी म्हटले. समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांची किंमत मलिकांना चुकवावी लागली असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.
मविआत जागा वाटप ठरले?
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादीकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यावर शरद पवार यांनी स्पष्टपणे भाष्य करताना म्हटले की, महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत कोणतीच चर्चा झाली नाही. आगामी निवडणुका एकत्रपणे लढवायच्या यावर एकमत झाले आहे. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य जागा वाटपांबाबत चर्चा करणार आहेत. त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास, उद्धव ठाकरे, मी (शरद पवार) आणि मल्लिकार्जुन खर्गे अथवा सोनिया गांधी हे निर्णय घेतील, असे सिल्वर ओकवरील बैठकीत ठरले असल्याचे पवारांनी सांगितले. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. या आघाडीत पहिल्या क्रमांकावरील पक्ष कोण दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष कोणता, याला महत्त्व नाही. माझ्यासाठी सगळेच महत्त्वाचे पक्ष आहेत, असेही पवार यांनी सांगितले.