कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आयोजित केलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा चौथा आणि अखेरचा टप्पा आजपासून कोल्हापुरातून सुरु झाला. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन, हे आंदोलन सुरु झालं.


राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, महिला आघाडी प्रमुख चित्रा वाघ यांच्यासह नेते-कार्यकर्त्यांनी अंबाबाईच दर्शन घेतलं.

महागाई, शेतकरी आणि कामगारांचे प्रश्‍न यांसह विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे.

“भाजपा सरकार हे पूर्ण अपयशी ठरलं आहे. सरकारने लोकांचा भ्रमनिरास केला, त्यामुळं हे फसवं सरकार आहे. या अधिवेधनात लोकांच्या प्रश्नावर चर्चा कमी आणि उंदीर, मांजर, सिंह या प्राण्यांवर चर्चा जास्त झाली.

त्यामुळं हे अधिवेशन आहे की प्राणी संग्रहालय असा प्रश्न उपस्थित करत, जनता दुधखुळी नाही” असं अजित पवार म्हणाले.

हे सरकार सामान्य शेतकऱ्यांचे कर्ज माफ न करता नीरव मोदी, मंत्री संभाजी निलंगेकर यासारख्या बड्या नेत्यांची कर्ज माफ करतंय. त्यामुळं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी देवो असं साकडं अंबाबाईला घातल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.