नागपूर :  महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानाचे एक मोठे यश म्हणावे लागेल असा एक माओवादी डंप एटापल्ली तालुक्यातील हालेवारा जंगलात पोलिसांना सापडला आहे. गडचिरोलीत आतल्या भागात, छोटी छोटी गावे आहेत आणि नक्षली वास्तव्य असणारी  जंगलं जास्त.. अशाच जंगलात एका झुडपात नक्षलींनी जमिनीत पुरून ठेवली होती सुमारे 16 लाखांची रोख, जी दोन हजाराच्या नवीन नोटांच्या बंडलाची होती. एवढेच नाही तर पुढे मागे स्फोट घडवून आणण्यासाठी लागणारे डिटोनेटर्स आणि इतर स्फोटक साहित्य ही माओवाद्यांनी इथे पुरून ठेवले होते. ह्या पुरलेल्या आपल्या धनाच्या जागेला नक्षली डंप म्हणतात. डंप म्हणजे एका दृष्टीने  माओवाद्यांचा बँकेचा सेव्हिंग अकाउंटच! 


पोलिसांना सापडलेले हे पैसे खंडणीचे असल्याचे कळते. तेंदू पत्ता कंत्राटदार तसेच विकासकामे करणारे सिव्हिल कंत्राटदार यांना काम भले ही ग्रामपंचायत आणि सरकार देत असली, तरी त्याच पैशातून इथे काम करायचे असेल तर आपल्या सुरक्षेसाठी ही मंडळी नक्षलींना  खंडणी देत असते. नोटबंदीनंतर दिलेल्या कालावधीत आपल्या डंप्सपर्यंत न पोहचू शकलेल्या नक्षलींना पुरून ठेवलेल्या जुन्या नोटा बदलता आल्या नव्हत्या. त्यामुळे पैसा अभावी चळवळीला बराच फटका बसल्याचे त्यांच्याच डॉक्युमेंटमधून समोर आले. पण परत एकदा खंडणीच्या माध्यमातून त्यांनी नवीन नोटांना जमवणे सुरू केले आहे. 


नोटबंदी ही 2016 ला झाली आणि हा डंप सुमारे 2018 सालचा असल्याचे कळतंय. नक्षली डंप तयार असाच होत नाही तर त्याची एक एसओपी आहे. हा डंप पोलिसांना मिळाला ह्याची कहाणी ही सुरस आहे. 2019 साली डंप माहीत असलेल्या एका मोठ्या नक्षली नेत्याने आत्मसमर्पण केले.  मात्र आत्मसमर्पण करून ही ह्याने पोलिसांना ह्या डंपची माहिती दिली नव्हती.  हा डंप तयार करताना नेहमीची एसोपी फॉलो करता आली नव्हती. सेंट्रल कमिटीचा सदस्य येऊ शकला नव्हता आणि त्यामुळे डंपची माहिती फक्त याला एकट्यालाच होती. त्यामुळे पैसे सुरक्षित आहेत, फक्त आपल्यालाच ते कुठे आहेत हे माहिती असल्याच्या विश्वासात तो होता. कधीतरी योग्य वेळी, कोणालाही न कळत तिथे जाऊन ते पैसे  स्वतःकडे ठेवण्याचा त्याचा प्लॅन असण्याची शक्यता आहे. पण या आत्मसमर्पित माओवादी नेत्याचे नशीब वाईट निघाले. त्याच्यानंतर  आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षली काडरला त्याच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती होती. ती रोख कुठे आहे हे आम्हाला माहिती नाही, पण याला माहिती आहे असे त्यांनी पोलिसांना सांगितले. आणि शेवटी पोलिसांनी त्या डंपचा पत्ता मिळवला! 


एकंदरीतच किती ही चांगले आणि भरपूर अत्याधुनिक शस्त्र असली, तरी गडचिरोलीतील हे युद्ध गनिमी काव्यानेच जिंकता येते. येथे माणसांचा विश्वास संपादन करणे, इंटेलिजन्स नेटवर्क चांगले ठेवणे, छोटी छोटी माणसे काय सांगत आहेत ते ऐकणे हे महत्वाचे आहे. तेच परत एकदा या  घटनेने अधोरेखित केले आहे.