मुंबई : धुळे ऊर्जा प्रकल्पातील जमीन खरेदी वादात असतानाच राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर तोरणमाळ येथील एमटीडीसीचे रिसॉर्ट बेकयदेशीररित्या ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नबाव मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार रावल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण ?

जयकुमार रावल संचालक असलेल्या तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीने नंदूरबार येथील एमटीडीसीचे रिसॉर्ट  15 वर्षांसाठी दरमहा 15 हजार रुपये भाडेतत्त्वावर चालवायला घेतलं. त्यानंतर पुन्हा भाडेकरार वाढवून तो 2006 पर्यंत करण्यात आला. 2006 पर्यंत या कंपनीने एमटीडीसीला भाडेच भरले नाही. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीला नोटीस पाठवून थकलेले भाडे व्याजासह भरण्याबरोबरच रिसॉर्ट खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली. मात्र, कंपनीने या नोटीसला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

एमटीडीसीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात कंपनीविरोधात याचिका दाखल केली. ‘आम्ही रिसॉर्ट दुरुस्तीवर 60 लाख रुपये खर्च केल्याचा दावा करत त्या रकमेची मागणी कंपनीने एमटीडीसीकडे केली. मात्र, कोर्टाने कंपनीला भाडे भरुन रिसॉर्टचा ताबा सोडण्याचे आदेश दिल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी केला आहे.

वादग्रस्त कंपनीची पार्श्वभूमी :

जयकुमार रावल मंत्री होण्यापूर्वी 21 मे 2015 रोजी पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे या वादाबाबत बैठकही घेतली होती. या बैठकीला तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीचे जयकुमार रावल यांच्यासह पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मात्र बैठकीबाबत पुढे कुठलाही निर्णय झाला नाही. रावल यांच्या या कंपनीने एमटीडीसीचे 41 लाख रुपये भाडे थकवले असून 2006 साली ताबा सोडण्याचे आदेश देऊनही ताबा न सोडता बेकायदेशीरपणे रिसॉर्टचा ताबा आपल्याकडे ठेवल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

जयकुमार रावल मंत्री झाल्यानंतर त्यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यांचे वडील आता या कंपनीवर संचालक आहे. दुसरीकडे जयकुमार रावल यांच्यावर राष्ट्रवादीने कागदपत्रांसह दुसरा एक गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर देशातील काही कंपन्या बंद करण्यात आल्या. या बंद करण्यात आलेल्या कंपन्यांच्या यादीत जयकुमार रावल यांची तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीही आहे. मात्र, कंपनी बंद केली असली तरी कंपनीचे व्यवहार अद्याप सुरु असून या कंपनीने रिसॉर्टचे ऑनलाईन बुकींगही घेतलं आहे. डिलक्स रुमचे 7 हजार रुपये भाडे भरुन 10 फेब्रुवारीचं बुकिंग केल्याची पावतीच नबाव मलिक यांनी मिळवली आहे.

नवाब मलिक यांनी मागणी :

यापूर्वी शेतकऱ्यांच्या जमीन खरेदी प्रकरणात आरोप झाल्यानंतर रावल यांच्यावर राष्ट्रवादीने हा दुसरा निशाणा साधला आहे. हे प्रकरण गंभीर असून रावल यांची मुख्यमंत्र्यांनी तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. यापूर्वी जमीन खरेदी प्रकरणात नवाब मलिक यांनी रावल यांच्याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार केली आहे.

संबंधित बातम्या :


जयकुमार रावल यांचा मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा



धर्मा पाटील मृत्यू: रावल, बावनकुळेंवर गुन्हा नोंदवा: नवाब मलिक