यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीच्या शोधपथकात 'नवाब' परतले!
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2018 11:48 AM (IST)
वन्यजीवप्रेमींनी आक्रमक आंदोलन केल्यानंतर नवाब यांना मोहरमनिमित्त सुट्टीवर जायचं असल्याचं सांगत वन विभागाने मोहिमेतून दूर ठेवलं होतं.
यवतमाळ : यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीच्या शोध पथकात शूटर नवाब शापत अली खान यांना पुन्हा पाचारण करण्यात आलं आहे. वाघिणीला शोधण्यात अपयश येत असल्यामुळे वन विभागाने निर्णय घेतला. यवतमाळच्या मारेगाव परिसरातील टी वन वाघिणीच्या दहशतीत जगणाऱ्या नागरिकांसाठी हा दिलासा ठरणार आहे. राळेगावच्या जंगलात नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी नवाब या मोहिमेत टीमसह सहभागी झाले होते. मात्र वन्यजीवप्रेमींनी आक्रमकपणे सर्वत्र आंदोलन केलं. त्यानंतर नवाब यांना मोहरमनिमित्त सुट्टीवर जायचं असल्याचं सांगत वन विभागाने त्यांना मोहिमेतून बाहेर ठेवलं होतं. आता नरभक्षक वाघिणीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्यासाठी वन विभागाने मध्य प्रदेशमधून चार आणि चंद्रपूरच्या ताडोबामधून एक, असे एकूण पाच हत्ती बोलावले होते. मात्र ताडोबातील हत्तीने साखळदंड तोडून धुमाकूळ घातला. हत्ती बेफाम होऊन त्याने घातलेल्या गोंधळात एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. त्यामुळे अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मोहिमेतून सर्वच हत्तीना स्वगृही पाठवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला. वाघीण रात्री कुठल्या भागात फिरते, याचा शोध घेण्यासाठी थर्मल ड्रोन वन विभागाने बोलावले असून त्याद्वारे वाघिणीचा शोध घेतला जात आहे. टी वन वाघिणीने शेवटचा बळी ऑगस्ट अखेर घेतला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सुप्रीम कोर्टाचा आदेश आला. जेरबंद करण्याचे पूर्ण करुनही शक्य नाहीच झालं, तरच ठार मारण्याच्या पद्धतीचा वन खात्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानेही उचलून धरला.