मुंबई: खासदार नवनीत राणा यांनी केलेले आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळून लावले आहेत. नवनीत राणा यांना लॉकअपमध्ये असताना बिसलेरीचं पाणी देण्यात आलं, तसेच त्यांना अधिकाऱ्यांसाठी असलेल्या बाथरुमचा वापर करु दिला असा अहवाल मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला दिला आहे. या संबंधित छायाचित्रंही या अहवालासोबत दिली असल्याची माहिती आहे. 


मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, खासदार नवनीत राणाशी संबंधित एक अहवाल मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला पाठवला आहे. सांताक्रूझ येथील लॉकअपमध्ये पोलिसांनी पाणी दिले नाही, शौचालयास देखील जाऊ दिले नाही असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. मात्र लॉकअपमध्ये असताना नवनीत राणा यांना प्यायला पाणी दिले होते. त्या वेळचे फोटोग्राफ्स देखील काढण्यात आले आहेत. इतकेच नाही तर लॉकअपच्या आवारात असलेल्या एका अधिकाऱ्याच्या केबिनमधील वॉशरुम देखील नवनीत राणा यांना वापरण्यासाठी दिले होते. हे सगळं कॅमेऱ्यात कैद झालं असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.


खासदार नवनीत राणा यांना लॉकअप मधील पाणी दिले, पण ते घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना पोलिसांनी बिसलेरी पाण्याची बॉटल दिल्याचं, तसेच चहा देखील दिल्याचं सूत्रांकडून समजतं. नवनीत राणा यांचे आरोप खोडून काढण्याइतपत पुरावे पोलिसांकडे आहेत असंही सांगितलं जातं.


काय आहे प्रकरण?
राणा दाम्पत्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पाणी देण्यात आलं नाही, तसेच बाथरूमदेखील वापरु दिलं नसल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ट्वीट करुन खार पोलीस स्टेशनमधला सीसीटीव्ही फूटेज शेअर केलं होतं. या फूटेजमध्ये राणा दाम्पत्य खार पोलीस स्टेशनमध्ये चहा पीत असताना दिसत आहे. सोबतच पाणी देखील त्यांच्यासमोर आहे. 


मुंबई पोलिसांच्या या व्हिडीओनंतर ती अपमानास्पद वागणूक खार नव्हे तर सांताक्रूझ पोलिसांनी दिली असल्याचा आरोप राणांचे वकील अॅड. रिझवान मर्चंट यांनी केला होता. नवनीत राणा यांना सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्येही चांगली वागणूक दिल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं.