रिक्षासोबत माणूसकी धावली; ऊसतोड महिलेची वाहतूक कोंडीतच प्रसूती, आई अन् बाळ दोघेही सुखरुप
नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज माणुसकीचा जिवंत अनुभव देणारी घटना घडली. रिक्षातच ऊसतोड महिलेची प्रसूती झाली आहे.
Nashik : नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आज माणुसकीचा जिवंत अनुभव देणारी घटना घडली. रिक्षातच ऊसतोड महिलेची प्रसूती झाली आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. यातून रिक्षा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, अशातच ही महिला रिक्षातच प्रसूती झाली.
भर रस्त्यात, रिक्षामध्येच त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला
सोलापूर जिल्ह्यातून ऊसतोड करुन मनमाड मार्गे नंदुरबार जिल्ह्यातील केळीपणी येथे परतत असतांना वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका गर्भवती ऊसतोड महिलेच्या प्रसूती वेदना अचानक सुरु झाल्या. रुग्णालय दूर आणि रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. कुटुंबीयांच्या डोळ्यांत भीती आणि असहायता होती. अशा वेळी अमजद अत्तर या रिक्षाचालकाने क्षणाचाही विलंब न लावता मदतीचा हात पुढे केला. सामाजिक कार्यकर्ते रितेश पगारे यांनी दुचाकीवरून मार्ग मोकळा करत रिक्षेला उपजिल्हा रुग्णालयात पुढे जाण्यास मदत केली. मात्र नियतीने वेगळाच क्षण ठरवला होता. भर रस्त्यात, रिक्षामध्येच त्या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला.
दोघांवरही उपजिल्हा रुग्णालय, मनमाड येथे उपचार सुरु
रस्त्याच्या कडेला, गोंधळाच्या वातावरणात उमटलेला त्या नवजात बाळाचा पहिला रडण्याचा आवाज आला आणि उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला. हा क्षण खऱ्या अर्थाने माणुसकीचा होता. सुदैवाने आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत. दोघांवरही उपजिल्हा रुग्णालय, मनमाड येथे उपचार करण्यात आले. दरम्यान, वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असली तरी आज त्या कोंडीतूनच माणुसकीचा सुवास दरवळला आणि काही हात पुढे आले म्हणून एक जीव सुरक्षित जन्माला आला.
महत्वाच्या बातम्या:
























