Nashik Crime News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 55 वर्षाच्या नराधमाकडून अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयित आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली आहे.
पोलिस ठाण्यात अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
मालेगावात 13 वर्षीय मतिमंद मुलीवर एका 55 वर्षाच्या संशयित आरोपीकडून अत्याचार करण्यात आल्याची निंदनीय घटना घडल्याने मालेगाव पुन्हा एकदा हादरले आहे. मालेगाव येथील पीडित मुलीला दिपक धनराज छाजेड या संशयित आरोपीने फूस लावून त्याच्या स्कुटीवर बसवून एका पडीत जागेवर नेत तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्याची आज न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेतली असून त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मालेगावात नेमकं चाललंय काय?
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे मालेगावात काय चाललंय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेने उभा महाराष्ट्र हादरुन गेला असताना त्यानंतर शहर व तालुका भागात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या आणखी पाच घटना ओळीने घडल्या आहेत. यामुळे लोकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे. गेल्या 16 नोव्हेंबर रोजी डोंगराळे येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी गावातील विजय खैरनार याला लागलीच अटक करण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या प्रकारामुळे जनप्रक्षोभ उसळला असतानाच शहरातील कलेक्टर पट्टा भागात 55 वर्षीय व्यावसायिकाकडून अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या व्यावसायिकाला अटक करण्यात आली. मुलीची आई या व्यावसायिकाच्या घरी घरकाम करीत होती. आईबरोबर त्याच्या घरी आलेल्या मुलीस फूस लावून त्याने निर्जनस्थळी नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केल्याचा संशय आहे. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसें दिवस वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या घटनामुळं भीतीचे वातावरण पसरत आहे.
महत्वाच्या बातम्या: