मुंबई : भोंदू मांत्रिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात राज्य सरकार आधीपासूनच सतर्क असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दोन आठवड्यापूर्वीच लक्ष घातलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरच राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली होती अशी माहिती आता समोर आली आहे. 

Continues below advertisement

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन आठवड्यांपूर्वीच या प्रकरणात लक्ष घातलं होतं आणि पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस महासंचालकांशी थेट संपर्क साधत आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देश दिल्याचं समजतंय. 

Police Action On Ashok Kharat : पुरावे आधीच ताब्यात

या प्रकरणात महत्त्वाचे व्हिडीओ क्लिप्स आणि इतर गंभीर पुरावे आधीच पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर अशोक खरातविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते, असंही सूत्रांनी सांगितलं.

Continues below advertisement

Nashik Crime Branch : ‘कॅप्टन’च्या अटकेचा थरार

नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका महिलेनं खरातविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँचनं खरातच्या घरावर छापा टाकत थरारक कारवाई केली.

अटकेची कुणकुण लागताच अशोक खरात पळून जाऊ शकतो, या शक्यतेमुळे पोलिसांनी योजनाबद्ध सापळा रचला होता. पोलिसांनी खरात राहत असल्याच्या परिसरात चोर शिरल्याचं कारण देत कारवाई सुरू केली, ज्यामुळे कुणालाही संशय आला नाही. त्यानंतर एक पथक अशोक खरातच्या घरात शिरलं, तर दुसरं पथक घराबाहेर तैनात होतं. खरात घरात असल्याची खात्री होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली.

या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली असून, भोंदूगिरीच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

Ashok Kharat Crime : रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी

नाशिकचा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचे विकृत कारनामे समोर आल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या भोंदूबाबाची पाद्यपूजा केल्यानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांनी पदावरून पायउतार व्हावं, अशी मागणी केली.  दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनीही चाकणकरांवर टीका करत त्यांना कोण वाचवतंय, असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकरांची पाठराखण केल्याचं दिसतंय. असं असलं तरी राष्ट्रीवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनीही चाकणकरांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. चाकणकर पदावर राहिल्या तर पुरावे नष्ट होतील, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली. 

ही बातमी वाचा: