Naresh Mhaske : शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निकटवर्तीय नगरसेवक यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) हे आज एकत्र पाहायला मिळाले. खुद्द नरेश म्हस्के यांनी याबाबत पोस्ट करुन माहिती दिली आहे. तसेच यशवंत किल्लेदार यांना म्हस्के यांनी खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. दोघेही राजकीय क्षेत्रात असलो तरीही पक्ष वेगळे झाले. पण काळाच्या कसोटीवर टिकून राहते तीच खरी मैत्री असल्याचे मत नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले नरेश म्हस्के?
'किल्ल्या' तसा माझा महाविद्यालयीन जीवनापासूनचा मित्र आहे. भारतीय विद्यार्थी सेनेचं एकत्र काम करत असल्यापासून दोघांची घट्ट मैत्री. महाविद्यालयीन जीवन संपलं, आमच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या. दोघेही राजकीय क्षेत्रात असलो तरीही पक्ष वेगळे झाले. पण काळाच्या कसोटीवर टिकून राहते तीच खरी मैत्री असल्याचे नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे. इतक्या काळानंतरही वेगवेगळी स्थित्यंतरं अनुभवल्यानंतर सुद्धा आमची मैत्री अजूनही अबाधित आहे. हा आमचा 'किल्ल्या' म्हणजे श्री. यशवंत किल्लेदार जे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजयी झाले आणि मनसेचे गटनेते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आज कोकण आयुक्तांकडे गेलो असता 'किल्ल्या'ची भेट झाली आणि अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. माझ्या ह्या मित्राला पुढील कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा असल्याचे नरेश म्हस्के म्हणाले.
मनसेच्या नगरसेवकांचा गटनेता म्हणून यशवंत किल्लेदार यांची नेमणूक
महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने त्यांचा महापालिकेतील गटनेता ठरवला आहे. मनसेच्या नगरसेवकांचा गटनेता म्हणून यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांची नेमणूक करण्यात आली. शिवतीर्थवर पार पडलेल्या बैठकीत पक्षाने हा निर्णय घेतला. या बैठकीसाठी सर्व नवनियुक्त नगरसेवक, मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. गटनेतेपदी निवड झाल्याची माहिती यशवंत किल्लेदार यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले की, आज सर्व नगरसेवकांची बैठक पार पडली. त्यामध्ये गटनेता म्हणून आपली निवड झाली. पक्षाकडून कोणत्याही प्रकारचं प्रतिज्ञापत्र घेतलं नाही, पक्षाला तशी गरज वाटली नाही. मुंबई महापालिकेत मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 192 मधून मनसेचे यशवंत किल्लेदार विजयी झाले आहेत. यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेच्या प्रीती पाटणकर यांचा 1 हजार 425 मतांनी पराभव केला. यशवंत किल्लेदार हे शिवसेना भवनाच्या प्रभागातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे त्यांचं जिकणं हे मनसेसाठी मोठा विजय मानला जात आहे.
महत्वाच्या बातम्या: