मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, आपल्याला चुकीचा इतिहास शिकवण्यात आला असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि त्यावरून आता राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय. त्याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तब्बल 10 वर्षांपूर्वी वक्तव्य केलं होतं आणि तो व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. 


संभाजी भिडे यांनी आयोजित केलेल्या धारातीर्थ यात्रेच्या निमित्ताने 5 जानेवारी 2014 रोजी नरेंद्र मोदी रायगड किल्ल्यावर आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदींनी केलेले भाषण आता व्हायरल होत आहे. शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, त्यांनी सूरत लुटली असा शब्दप्रयोग करून इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचा घोर अपमान केल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणातून केला. सूरतमध्ये औरंगजेबचा खजिना होता आणि शिवाजी महाराजांनी तो ताब्यात घेतला. या कामात शिवाजी महाराजांना सूरतमधील स्थानिक लोकांची मदत झाली असं नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. 


नरेंद्र मोदींनी रायगडवरील केलेलं भाषण खालीलप्रमाणे, 


भारतीय इतिहासकारांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्याचे अनेक पैलू लोकांसमोर आणले. शिवाजी महाराजांनी लहान लहान मावळ्यांना सोबत घेतलं आणि स्वराज्य स्थापन केलं. मावळ्यांमध्ये उर्जा भरून महान राज्याची स्थापना केली. भारताला गुलामीतून मुक्त करण्यासाठी शिवाजी महाराज लढत होते.


साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराज सूरतमध्ये आले होते. इतिहासकारांनी शिवाजी महाराजांच्यावर अन्याय केला. शिवाजी महाराजांनी सूरत लुटली असं त्यांनी लिहिलं. शिवाजी महाराजांनी सूरत आले कारण औरंगजेबाने त्याची सर्व संपत्ती सूरतमध्ये जमा केली होती. शाईस्तेखान त्या खजान्याचं संरक्षण करत होता. जर हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची असेल तर या लुटेऱ्यांनी लुटलेल्या धनाचा वापर करायला हवा. या संपत्तीचा वापर करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करायली हवी असा विचार शिवाजी महाराजांनी केला. 


शिवाजी महाराजांनी स्थानिक लोकांची मदत मिळाली नसती, समर्थन मिळालं नसतं तर हे काम शक्य नव्हतं. मी इतिहासकार नाही. पण मला असं वाटतं की, त्या काळात सूरतमधील काही लोक होते, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व माहिती दिली होती. त्यांनी ये-जाण्याचा मार्ग दाखवला होता. शिवाजी महाराजांच्या सूरतमध्ये आलेल्या लोकांना लपवण्याची, जेवणाची व्यवस्था केली असेल. सूरतच्या नागरिकांची शिवाजी महाराजांना सर्व गोष्टींची मदत केली असेल.  


त्यामुळेच शिवाजी महाराजांना औरंगजेबाचा खजाना ताब्यात घेता आला. सूरत लुटली हा शब्दप्रयोग म्हणजे शिवाजी महाराजांना घोर अपमान आहे. ही विकृत इतिहासकारांची देण आहे. या अशा शब्दांमुळेच ज्या इतिहासाचा स्वाभिमान आणि गौरव व्हायला हवा त्याबद्दल काही ना काही शंका उपस्थित केली जाते. 


ही बातमी वाचा: