Nandurbar Rain : सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होतं आहे. कुठं थंडीचा कडाका जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातचावरण जाणवत आहे. तर काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. नंदुरबार जिल्ह्यातील काकळदा परिसरात तुफान पाऊस सुरु आहे. गेल्या अर्ध्या तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळं रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता
हवामान खात्याने नंदुरबार जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला होता. त्यानंतर जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली आहे. अवकाळी पावसामुळं रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसामुळं आंबा, गहू, हरभरा, ज्वारी मका या पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे, त्यातच वरुनराजा बरसल्याने शेतकरी अजून अडचणीत सापडणार आहे.
या भागात पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान विभागानं राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 27 ते 29 डिसेंबर या काळात मेघगर्जना, गारपीटीसह पाऊस होऊ शकतो. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर तसेच दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये 27 डिसेंबर रोजी दुपारपासून हवामानात बदल होण्यास सुरुवात होईल आणि पाऊस बरसेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर 27 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या भागात वादळी पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागाने सांगितले आहे. यातील काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांत काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत पाऊस पूर्वेकडे सरकेल. हाच पाऊस विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. बदलत्या हवामानाची हीच शक्यता लक्षात घेऊन हवामान विभाग तसेच कृषि विभागाने शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या: