नांदेड : गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय नेत्यांचे गुन्हेगारांसोबत असलेले लागेबांधे यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोर जावं लागलं आहे. बीडमधील प्रकरणानंतर मंत्र्याला राजीनामा देण्याची वेळ आली, त्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षात प्रवेश देताना चारित्र्य तपासा, गुंड आणि दोन नंबदचे धंदे करणाऱ्यांना पक्षात प्रवेश देऊ नका, असं म्हटलं होतं. त्याचबरोबर पक्ष प्रवेश कोणाला द्यावा यावर अजित पवार यांनी परभणी येथील कार्यक्रमात सविस्तरपणे सांगितलं होतं. मात्र नांदेडमध्ये अजित पवारांच्या आदेशाला आमदार प्रताप पाटील चिखलीकरांकडून केराची टोपली दाखवण्यात आली होती. नांदेडमध्ये गुंड आणि दोन नंबरचे धंदे करणाऱ्याला राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश देण्यात आला होता, त्यानंतर टीका झाल्यावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना माझ्याकडून चूक झाली असं म्हटलं आहे.
अन्वर अली खान हा मटका किंग
नांदेड शहरातील मटका किंग, गुंड अन्वर अली खान याने काल (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गुंड अनवर अली खान याला स्वतःच्या निवासस्थानी बोलावून पक्षात प्रवेश दिला होता. अन्वर अली खान हा मटका किंग असून शिवाय त्याच्यावर मारहाण, बळजबरी जमिनीवर कब्जा करणे, बेकादेशीर शस्त्र बागळणे, हवेत गोळीबार, बायो डीझेल विकल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत, त्याला प्रवेश दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती, त्यानंतर आज चिखलीकरांनी केलेली चूक दुरूस्त केली असल्याचं म्हटलं आहे.
याशिवाय कुख्यात दहशतवादी हरविंदर सिंघ रींदा याने घडवलेल्या संजय बियाणी हत्या प्रकरणात देखील अन्वर अली खान याची संशयित म्हणून चौकशी करण्यात आली होती. सध्या राष्ट्रवादीचे प्रताप पाटील यांनी पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे. याच नादात कुणाला प्रवेश द्यावा कुणाला देऊ नये हे चिखलीकर विसरून गेल्याची चर्चा होती, दरम्यान याबाबत बोलताना चिखलीकर म्हणाले, 'नांदेडच्या मटका किंगला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला होता, आता आता त्यांचा प्रवेश रद्द केल्याची माहिती लोह कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी एबीपी माझासोबत बोलताना दिली आहे. माझ्याकडून चूक झाली ती चूक मी दुरुस्त केली आहे, बच्चू यादव याच्या सांगण्यावरून हा पक्ष प्रवेश झाला होता, त्याला सुद्धा काढून टाकले आहे, असे चिखलीकर यांनी सांगितले.