Nanded : नांदेडमधील पाटील हॉस्पिटमधील डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे एका 25 वर्षीय विवाहितेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परभणी जिल्ह्यातील सोन्ना येथील रहिवासी असलेल्या सुचिता गोपीनाथ कदम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरसह जबाबदार स्टाफवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी नांदेडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
नातेवाईकांनी केला गंभीर आरोप
सुचिता कदम यांना 8 नोव्हेंबर रोजी पाटील हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते. नातेवाईकांच्या आरोपानुसार, प्रसूती वेदना नसतानाही रुग्णालयातील डॉक्टरने त्यांचे सिझेरियन ऑपरेशन केले. ऑपरेशननंतर झालेल्या अति रक्तस्त्रावामुळे त्यांना बाहेरून आणलेले रक्त चढवण्यात आले. मात्र, रक्ताची कोणतीही आवश्यक चाचणी न करता ते चढवल्यामुळे सुचिता यांना त्याचे संक्रमण झाले आणि त्यांची प्रकृती गंभीर बनली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच पाटील हॉस्पिटच्या स्टाफने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले. तेथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना हैदराबादला हलवण्यात आले. परंतु, प्रकृती साथ देत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना पुन्हा नांदेडमधील दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस 8 डिसेंबर रोजी सुचिता यांचे निधन झाले.
प्रसुतीनंतर बाळ सुरक्षित असले तरी मातेचा मृत्यू
दरम्यान, हा सर्व प्रकार डॉ. मीनल पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या उपचारांमुळे घडला, असा आरोप सुचिताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी डॉ. मीनल पाटील यांच्यासह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तीव्र मागणी केली आहे. दरम्यान, प्रसुतीनंतर बाळ सुरक्षित असले तरी मातेचा मृत्यू झाल्याने ते पोरके झाले आहे. या घटनेमुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे.
रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
प्रसुतीसाठी सुचिता कदम यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितले की रक्त कमी आहे. रक्त भरावे लागेल असे सांगितले. त्यानंतर रक्त चढवण्यात आले. त्यानंतर इन्फेक्शन झाले. त्यानंतर डॉ. मीनल पाटील यांनी सुचिता कदम यांना प्रसुतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले होते. बाळ आमच्याकडे सुरक्षीत दिले. मात्र, सुचिता कदम या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयता त्यांना नेण्यात आले. तिथेही त्यांच्यावर उपचार होत नसल्याने सिकंदरबाद या ठिकाणी नेले. पण तेथील खर्च परवडत नसल्याने परत नांदेडमध्ये आणले. तिथेच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. आमच्या मागणी आहे की, या रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. लवकरात लवकर त्यांना अटक करुन कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.