नांदेड : राज्यभर गाजलेल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव, कृष्णुर येथील धान्य घोटाळ्यात आता अंमलबजावणी संचालनालयाने उडी घेतली आहे. याच प्रकरणी यातील मुख्य आरोपी असलेल्या इंडिया ऍग्रो अनाज लिमिटेड कंपनीचा मालक अजय बाहेती यांच्या विरोधात मनी लॉंड्रिंग अंतर्गत गुन्हा नोंदवत ईडीने त्याला अटक केलीय. तर नांदेड न्यायालयाने अजय बाहेती याला आठ दिवसाची कोठडी सुनावली आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील कृष्णुर एमआयडीसीमध्ये अजय बाहेती यांची इंडिया ऍग्रो अनाज लिमिटेड नावाची कंपनी आहे.


अजय बाहेती हा अन्न पुरवठा विभाग व धान्य वितरण यंत्रणेला हाताशी धरून शासकीय वितरणाचा गहू व तांदूळ चोरीच्या मार्गे थेट आपल्या कंपनीत उतरवून घेत होता. त्यावेळी नांदेडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या कंपनीमध्ये धान्याची अवैध वाहतूक होत असताना 11 ट्रक पकडण्यात आले. त्यानुसार कुंटुर पोलीस ठाण्यात 11 ट्रक चालकासह मुख्य आरोपी अजय बाहेती, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, व्यवस्थापक ओमप्रकाश तापडिया, वाहतूक कंत्राटदार राजू पारसेवार आणि ललित खुराणा यांच्यासह 19 जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला होता.


पुढे हा तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यात अजय बाहेती, संतोष वेणीकरसह 19 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतरही जामिनावर सुटलेल्या अजय बाहेती याचे गोरखधंदे सुटले नाहीयेत. कारण याच इंडिया अनाज ऍग्रो कंपनी अंतर्गत हजारो शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून वर्ष लोटले तरी शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. तसेच या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी महसूलचा अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हा सीआयडी, पोलीस विभागाच्या हातावर तुरी देऊन गेल्या वर्षभरापासून फरार आहे. तर सदर प्रकरणातील फरार आरोपी संतोष वेणीकर हे भूसंपादन कार्यालय परभणी येथे रुजू झाल्याची माहिती मिळतेय. सदर आरोपीस या अगोदरच न्यायालयाने त्याच्या नावाने जागोजाग पोष्टर लावून त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्यानंतरही अद्याप संतोष वेणीकर मात्र फरार आहे.


त्यानंतर गुरुवारी ईडीने या प्रकरणात सतर्कता दाखवत बाहेतीला अटक केलीय. तसेच घोटाळ्याची बातमी प्रकाशित न करण्यासाठी अनेक पत्रकारांनी आरोपींकडून लाखों रुपये उकळल्याची माहिती आरोपीने ईडीला दिल्यामुळे अनेक पत्रकार ईडीच्या रडारवर आहेत. कृष्णुर धान्य घोटाळ्यातील आरोपींकडून लाखो रुपये उकळल्याची आरोपीने ईडीकडे कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे. अनेक दिगग्ज वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधी व वृत्त पत्राच्या प्रतिनिधींचे नावे आरोपीकडून ईडीकडे सुपूर्द केल्याची माहिती मिळतेय. ईडीची पीडा मागे लागण्याचे संकेत मिळाल्याने अनेक पत्रकारांचे अवसान गळून धाबे दणाणलेत. 


या धान्य घोटाळ्यात जिल्ह्यातील काही राजकिय नेते मंडळी, माजी आमदारांचे नातेवाईक व अनेक प्रतिष्ठित पत्रकार अनोळखी सरकारी कर्मचारी, अधिकारी, दलाल, व्यावसायिकांचाही सहभाग असल्याचा संशय ईडीने व्यक्त केलाय. सदर प्रकरणात तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी कार्यवाही केल्यानंतर महसूल विभागाने या धान्य घोटाळा प्रकरणात योग्य सहकार्य न केल्यामुळे एसपी विरुद्ध जिल्हाधिकारी असा वाद निर्माण झाला होता. तर ज्याप्रमाणे धान्य घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अजय बाहेती याला ताब्यात घेण्यास ईडीने सतर्कता दाखवली. त्याच प्रमाणे गेल्या एक वर्षभरापासून फरार असणारा आरोपी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यालाही लवकर ताब्यात घेऊन घोटाळ्यातील तपास गतिमान करावी, अशी मागणी नांदेडकरांकडून होत आहे.