नांदेड: जिल्ह्यातील मालेगाव जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडलाय. शिक्षणाचे मंदिर असलेल्या शाळेतच माजी उपसरपंच आणि शालेय समिती अध्यक्ष यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन नंतर तुंबळ हाणामारीत रूपांतर झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान उपसरपंच आणि शालेय समिती अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापकांसमोरच एकमेकांना भिडल्याचा प्रकार घडला आहे. या विषयी मालेगाव पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध  तक्रारीही दाखल झाल्या आहेत.  


काही दिवसांपूर्वीच रात्रीच्या शाळेमुळे राज्यभर प्रसिद्धीस आलेली हीच जिल्हा परिषद शाळा आता मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आलीय. माजी उपसरपंच सिद्धार्थ वाघमारे आपला निर्गम उतारा काढण्यासाठी शाळेत गेले होते. मुख्याध्यापकांच्या कार्यालयात मुख्याध्यापक सूर्यवंशी यांच्याशी ते बोलत असताना, शालेय समितीचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले आणि सिद्धार्थ वाघमारे यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. त्याचे पर्यवसन पुढे हाणामारीत होऊन मोठा राडा झाला. 


विशेष म्हणजे गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मुख्याध्यापकांच्या समोरच हा प्रकार घडला. त्यावेळी मुख्याध्यापकांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली आणि या विद्येच्या मंदिरास कुस्तीचा आखाडा होऊ दिलाय. 


दरम्यान, शाळेमध्ये शिक्षकांचे दोन गट असल्याने तसेच त्या गटांमुळे शाळेत ज्ञानदानाचे कार्य कमी आणि राजकारण जास्त चालत असल्याने असे प्रकार घडणे हे नित्याचेच झाले आहे. त्याचाच परिणाम की काय ज्यामुळे शाळेत या हाणामारीची घटना घडल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे हा हाणामारीचा सर्व प्रकार शाळेतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालाय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - 


 


ABP Majha