नांदेड : आग, वणवा लागण्याच्या घटना मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या किनवट तालुक्यातील सारखणी जंगल परिसरात असणाऱ्या मांडवी वन परिक्षेत्राला गेल्या दोन दिवसांपासून भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. आगीच्या मोठमोठया ज्वाळा अद्याप धगधगत असून, त्यामुळं वनक्षेत्रात असणाऱ्या दुर्लभ प्रजातींचे पक्षी, प्राणी, वनस्पती आगीमुळे नामशेष होण्याची भीती वर्तवली जात आहे. आगीचं स्वरुप मोठं असूनही वन विभागाकडून मात्र अद्याप आग विझवण्याचा कोणताही प्रयत्न नाही अशी माहितीही समोर आली आहे.


सदर जंगल परिसर हा अभयारण्याचा परिसर असल्यामुळे विविध जातीचे पक्षी, प्राणी, वाघ, अस्वल, लांडगा, हरीण, चितळ, नीलगाय यांसारखे विविध प्राणी येथे वास्तव्यास आहेत. त्याच प्रमाणे मोह, सागवान, चंदन, पळस, खैर अशी विविध जातीची झाडे, दुर्लभ औषधी वनस्पती या जंगलात आढळतात. 


आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यांना लागून असणारं हे जंगल हजारो एकरच्या परिसरात विस्तारलेलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक तासांपासून सुरु असलेल्या या आगीने शेकडो एकर वन्य जमिनीला गिळंकृत केल्याचं चित्र आहे.


कडक नियमावलीचा सरकारने पुनर्विचार करावा अन्यथा जनतेचा उद्रेक होईल, उदयनराजे भोसलेंचा इशारा


ही आग इतकी मोठी होती की रात्रीच्या वेळेत माहूर, सारखनी गावातुन आगीच्या भयंकर ज्वाला दूरवर दिसत होत्या. गेल्या दोन दिवसापासून चालू असलेली ही आग विझवण्यासाठी अद्याप मांडवी वन परिक्षेत्रातील कोणताही वन अधिकारी फिरकला नाही अथवा पाहणी केली नाही. त्यामुळे जंगल क्षेत्रातील लाखो झाड़ं आणि वन्यजीव आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याची भीती वन आणि वन्यजीव प्रेमीनी व्यक्त केली आहे. किनवट अभयारण्य परिसरातील जलधारा, सारखणी येथील गेल्या आठ दिवसातील ही तिसरी घटना आहे. सदर आग लवकर आटोक्यात आणली न गेल्यास  किनवट अभयारण्याला मोठं नुकसान होण्याची बाब टाळता येणार नाही.