नांदेड : जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील सुभाष राठोड नामक नराधम बापानं अल्पवयीन असणाऱ्या स्वतः पोटच्या मुलीस महाराष्ट्रासह राजस्थान येथे विक्री केल्याची खळबळजनक घटना घडली. सुभाष राठोडने त्याची पत्नी तथा मुलीच्या सावत्र आईनं आणि भावाच्या मदतीनं आपल्या 17 वर्षीय मुलीची विक्री केल्याची माहिती पीडित मुलीची मावशी आणि पीडित मुलीनं एबीपी माझाशी बोलताना दिली.
हदगाव तालुक्यातील वारकवाडी येथील रहिवासी असणाऱ्या सुभाष राठोड याने काही वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीला काडीमोड देऊन दुसरा संसार थाटला. दरम्यान पहिल्या पत्नीकडून सुभाष राठोड याला एक मुलगी होती. परंतु पहिल्या पत्नीशी काडीमोड घेतल्यानंतर सुभाषनं आपल्या मुलीस स्वतः कडेच ठेऊन घेतलं. तिला सातवीपर्यंत शिक्षण दिल्यानंतर आपली पत्नी आणि भावाच्या मदतीनं मुलगी अल्पवयीन असून आठव्या वर्गात शिकत असतानाही 2019 साली या नराधम बापानं राजस्थान येथील भावना चावला या महिला एजंटच्या हातानं राजकोट येथे पोटच्या पोरीची विक्री केली. राजस्थान येथील गोंडल या गावी पीडितेची विक्री करण्यात आली. या कालावधीत पीडित मुलीस जेवणातून गुंगीचे औषधी देऊन तिच्यावर एक महिना दोन पुरुषांकडून पाशवी अत्याचार करण्यात आले. या अत्याचारात तिला गर्भधारणा होऊन तब्येत बिघडल्यामुळे पिडीतेला तिच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं. राजस्थान येथे दोन नराधमानी केलेल्या शारीरिक आणि मानसिक पाशवी अत्याचारातील गर्भ, सुभाष राठोडनं गावठी उपचार देऊन पाडला.
यादरम्यान दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर 2020 ला सुभाष राठोड हा कामानिमित्त औरंगाबाद येथे वास्तव्यास गेला. औरंगाबाद येथे गेल्यानंतर सुभाष राठोडनं कदम या एजंटच्या मदतीनं पीडित मुलीची नंदुरबार येथील 45 वर्षीय संदीप दिलीप माळी या व्यक्तीस 2 लाख रुपयांत विक्री केली. या दरम्यान पीडितेवर नंदुरबार येथील व्यक्तीकडून जवळपास आठ महिने बळजबरी, शारीरिक शोषण करण्यात आले. या कालावधीत सुभाष राठोडनं माळी याला उर्वरित पैशाची मागणी केली, पण तो उर्वरित पैसे देऊ शकला नाही. म्हणून सुभाष राठोड मुलीला घेऊन घरी आला.
यानंतर मात्र सुभाष राठोड याने मुलीच्या इच्छे विरोधात बळजबरीने पुन्हा तिसऱ्या वेळी सातारा येथील विठ्ठल गायकवाड नावाच्या 30 वर्षीय व्यक्तीला 2 लाखाला विक्री केली. दरम्यान मुलीची विक्री केल्याचं वाटू नये म्हणून मंदिरात माळा टाकून लग्न झाल्याचा बनाव केला आणि काढून दिले. या दरम्यान सातारा येथील इसमाकडून जवळपास सहा महिने पीडित मुलीचे शारिरीक शोषण करण्यात आले. या दरम्यान पीडितेने विरोध केला त्यावेळी तिचा मारहाण करून शारीरिक, मानसिक छळ करण्यात आल्याची आपबिती पीडितेनं सांगितली. सदर इसमाकडून होणाऱ्या सततच्या त्रासास कंटाळून पीडितेने पळून जाऊन कशीबशी स्वतः ची सुटका करून घेतली आणि आपल्या मावशीकडे हदगाव येथे राहण्यास आली. या घटनेची फिर्याद हदगाव पोलिसांना दिली असता हदगाव पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद पीडितेस मिळाला नाही. दरम्यान घडला प्रकार पीडितेने महिला सामाजिक कार्यकर्त्या महादेवी मठपती यांना सांगितल्यानंतर जिरोतून औरंगाबाद पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र अद्याप कोणत्याही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं नाही. पोटच्या पोरीची सख्ख्या बापानेच अशा प्रकारे तीनवेळा विक्री केल्याच्या घटनेमुळं नांदेड जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली आहे.