नांदेड: एकीकडे राज्यभरात पणनमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा आणि भाजप खासदार संजय काकडे यांच्या मुलीच्या शाही लग्नाची चर्चा आहे. मात्र त्याचवेळी राज्याच्या एका टोकाला असलेल्या नांदेडमधील एक सामूहिक विवाह सोहळ्याचंही चांगलंच कौतुक होत आहे.
कारण भोई समाजाच्या या सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल 14 जोडप्यांचं शुभमंगल झालं. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे वारेमाप खर्च न करतात, अत्यल्प खर्चात धूमधडाक्यात लग्न लावून देण्यात आलं.
विवाह सोहळ्यावर होणारा आर्थिक खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह मेळावे मोठ्या प्रमाणावर घेण्याची गरज निर्माण झाली आहे. भोई समाजातही सामूहिक विवाह मेळाव्यांची संकल्पना रुजत आहे.
मासेमारी करणाऱ्या भोई समाजाचा असाच एक सामूहिक विवाह मेळावा नांदेडमध्ये पार पडला. या विवाह मेळाव्यात प्रतिकवार भोई समाजातील मराठवाड्यातील एकूण 14 जोडपी विवाहबद्ध झाली.
अत्यल्प खर्चात समाजातील लोकांनी पुढाकार घेत हा सामूहिक विवाह मेळावा यशस्वी केला. भोई समाज आजही मोठ्या प्रमाणात मासेमारीवर उदरनिर्वाह करतो. त्यामुळे समाजातील लोकांकडे विवाह सोहळ्यावर खर्च करण्याची ऐपत नसते. अशा कुटुबांना आधार देण्यासाठी हे सामूहिक विवाह मेळावे आधार ठरत आहेत.
हुंडा प्रथा मोडीत काढत अशाप्रकारचे सामूहिक विवाह मेळावे अधिकाधिक प्रमाणात घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नवदांपत्याने दिली.
सामूहिक विवाह मेळाव्यामुळे वेळ, पैसा, सर्वांचीच बचत होतेच, त्यामुळे वारेमाप खर्च टाळण्यासाठी अशा सामूहिक विवाह सोहळ्यांची गरज आहे.