कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? हे सरकार गोरगरिबांचं नसून धनदांडग्यांचं, नाना पटोलेंचा हल्लाबोल
महाराष्ट्रात ओला दुष्काळ असताना नियम सांगून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने राज्यातील शेतकऱ्याला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.
Nana Patole on Govt : महाराष्ट्रात ओला दुष्काळ असताना नियम सांगून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्याला उध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याची टीका काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. राज्यातील डबल इंजिनचं सरकार गोरगरिबांचं नसून धनदांडग्यांचं सरकार आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारनं महाराष्ट्राची अवदसा निर्माण करून ठेवलीय अशी टीका पटोलेंनी केली. माझगाव क्रिकेट क्लब नियमानुसार आमचं नाव काढू शकत नाही. जर, सरकारनं सत्तेचा दुरुपयोग करून आमचं नाव रद्द केल्यास आम्ही कोर्टात जाऊ. न्यायव्यवस्था आम्हाला न्याय देईल, असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला.
डबल इंजिनचं सरकार शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, गरिबांसाठीच का फेल, धनधांडग्यांसाठी धावतंय
ओला दुष्काळ महाराष्ट्रात आहे. अशाही परिस्थितीत राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. विरोधी पक्षात असताना याच देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळाची मागणी केली होती. पण आता ते नियम सांगत असल्याचे पटोले म्हणाले. त्या राजकारणात न जाता, आता शेतकरी एकीकडे उध्वस्त होत असताना त्याला मदत करण्याची भूमिका जाहीर केली जाते. केंद्रीय गृहमंत्र्यांनीही मोठी मदत दिली हे सातत्याने सांगितले जाते. केंद्रात डबल इंजिनचं सरकार असताना हे सरकार मदत देण्यात का फेल पडत आहे असा सवाल पटोलेंनी केला. हे डबल इंजिनचं सरकार शेतकऱ्यांसाठी, बेरोजगारांसाठी, गरिबांसाठीच का फेल होत आहे. पण, धनदांडग्यांसाठी हे सरकार धावत असल्याचे पटोले म्हणाले. मग हे सरकार धनदांडग्यांचं आहे की, सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आहे? महाराष्ट्र कुठून कुठे नेऊन ठेवलाय? हा दिवाळीच्या दिवशी मला या सरकारला प्रश्न विचारायचा आहे.
महाराष्ट्राची अवदसा निर्माण करुन ठेवण्याचं पाप या राज्याच्या सरकारनं केलंय
महाराष्ट्राची अवदसा निर्माण करुन ठेवण्याचं पाप या राज्याच्या सरकारनं केलेलं आहे आणि त्यात केंद्र सरकारचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील त्रिकूट सरकार आहे. यात लूटपाट चाललेली आहे. कुणाच्या हातात किती भेटते? कोण किती लुटतय? यावर या सरकारमध्ये काम चाललेलं आहे. जनतेचं देणंघेणं नाही. गेल्या साडेचार वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नाही आणि आताही घेणार नव्हते अशी स्थिती असताना माननीय सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीच्या आत निवडणुका घेण्याची तंबी दिल्यामुळे या निवडणुका महाराष्ट्रात होऊ लागलेल्या आहेत.
या सरकारचं वस्त्रहरण कसं करता येईल हे महाराष्ट्रातील जनतेनं डोक्यात आणलं पाहिजे
या सरकारचं वस्त्रहरण कसं करता येईल हे महाराष्ट्रातील जनतेनं डोक्यात आणलं पाहिजे. यांना पैशाचा माज आहे. पैशांनी लोकांचं मत विकत घेऊ. आश्वासन मोठ्या प्रमाणात देऊ आणि निवडून येऊ, अशी त्यांची मानसिकता आहे. माझगावचा क्रिकेट क्लब हा नियमानुसार आहे. एमसीए चे जे नियम आहेत, त्याचे पूर्ण पालन माझगाव क्रिकेट क्लबने केलेले आहे. आमचं नाव कटू शकत नाही. असा माझा विश्वास आहे असं पटोले म्हणाले. क्रिकेट हे आता सगळं राजकीय झालं आहे. सत्तेतील लोकांनी सत्तेचा दंडा त्याच्यावर कसा चालवायचा हा त्यांचा खेळ सुरू झालेला आहे. त्यामुळं आता जे जे पुढे येईल त्या प्रत्येक गोष्टीला मी पुढे जायला तयार आहे. समजा सरकारने आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून आमचं सदस्यत्व रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला न्यायव्यवस्था न्याय देईल असे पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:

















