Nana Patole Controvercy : नाना पटोलेंकडून मोदींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच आहे. "ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं", असं वक्तव्य केल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) पुन्हा वादात सापडले आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. त्याबद्दल नाना पटोले यांना विचारलं असता नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान, नाना पटोले यांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी  येथे सुरू असलेल्या काँग्रेस (Congress) प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली होती. मात्र, जाता-जाता पुन्हा एकदा त्यांनी आणखी एका वादाला तोंड फोडलं आहे.


भंडाऱ्यात मोदींबद्दल एक वक्तव्य करुन वाद ओढवून घेतलेल्या नाना पटोलेंनी मोदी नाव वापरत आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद उभा राहिला आहे. मात्र ते वक्तव्य पंतप्रधान मोदींबद्दल नव्हतंच असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी आज एबीपी माझाशी बोलताना दिलं आहे. असं असलं तरी भाजप मात्र नाना पटोलेंविरोधात राज्यभरात आक्रमक झालेली दिसतेय. आज पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. पुण्याच्या अलका चौकात भाजपकडून घोषणाबाजी करण्यात आली. तर नाना पटोलेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी पटोलेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 


नाना पटोले यांनी पुन्हा केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नाना पटोले आज मुंबईत असल्यानं इथं भाजप कार्यकर्ते आंदोलन करण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही टीका केली आहे. काँग्रेसनं नाना पटोलेंची शारिरीक आणि मानसिक चाचणी करून घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. 


काँग्रेसनं नाना पटोलेंची शारिरीक आणि मानसिक चाचणी करून घ्यावी : चंद्रकांत पाटील 


नाना पटोले यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की,  नाना पटोले यांना कॉंग्रेसने अंडर ऑबाझर्वेशन ठेवावं.  शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी. ज्याची पत्नी पळून जाते त्याला मोदी म्हणतात, असं म्हणणार्‍या नाना पटोलेंना नक्की काय म्हणायचंय. सर्वोच्च नेत्यावर टीका करुन प्रसिद्धी मिळवावी हा नाना पटोलेंचा प्रयत्न आहे. नाना पटोले राजकारणाची पातळी किती खाली नेत आहेत, याचा कॉंग्रेसनं विचार करावा, असंही ते म्हणाले. 


यापूर्वी काय म्हणाले होते नाना पटोले?


भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो' असं वक्तव्य केलं होतं. एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ रात्रीच्या वेळीचा आहे. या प्रचाराच्या दरम्यान नाना पटोले यांच्याभोवती लोकांचा गराडा आहे. त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणतात की, 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.' नाना पटोलेंचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. तर नाना पटोले यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. राज्यात विविध पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha