नागपूर : एक दिवस नीट झोप झाली नाही, तर दुसरा दिवस खराब जातो. मात्र नागपूरमध्ये एका व्यक्तीला एक-दोन दिवस नाही, तर तब्बल 33 वर्ष शांत झोप लागलेली नाही. डॉक्टरांनी केलेल्या यशस्वी शस्त्रक्रियेने दीपक म्हैसेकर यांच्या डोळ्याला डोळा लागला.


झोपण्यासाठी आडवं झालं की दीपक 15 मिनिटात घाबरुन उठायचा. म्हणजे जवळपास जन्मापासून 12 हजार दिवस झाले, दीपक सुखाची झोप घेऊ शकला नाही. त्याचं जेवणही मोजकंच होतं. दीपकच्या आई अनिता म्हैसेकरही आपल्याला झालेला त्रास सांगतात.

दीपकला ट्रेचर कॉलिन्स सिंड्रोम ( treacher collins syndrome ) असल्याचं डॉक्टरांनी निदान केलं. दीपकला झालेला आजार हा जनुकीय आहे. मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी दोन्ही जबड्यात अडकल्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा अत्यल्प प्रमाणात होतो.

वैद्यकीय भाषेत याला advance sleep apnia म्हणजेच निद्रानाश असे म्हणतात. रुग्ण 15 मिनिटं ते अर्ध्या तासात झोपेतून घाबरुन उठतो. 50 हजारात एकाला हा आजार होतो. मात्र उपचारासाठी लागणारे 10 लाख रुपये दीपककडे नव्हते.

33 वर्षांच्या निद्रानाशानंतर नागपूरच्या दंत महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी दीपकवर उपचार केले. पक्षाघाताचा धोका होता, पण डॉक्टरांनी कुशलतेनं शस्त्रक्रिया पार पडली.

शासकीय दंत महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी दीपकवर यशस्वी शत्रक्रिया करुन त्याला नवजीवनच दिले आहे. गेल्या 33 वर्षांपासून न झोपलेला माणूस अखेर शांत झोपी गेला.