Aaditya Thackeray : वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. कारण विदर्भ महाराष्ट्राचं एक अंग असल्याचे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. विजय वडेट्टीवार विदर्भाचे नेते आहेत, मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत, या दोघांनी चर्चा करावी असेही आदित्य ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी केली. तीच मागणी आम्ही आता सुद्धा ठेवणार आहोत. कुठल्यागी निवडणुका न पाहता शेतकऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी केली होती. आता कर्जमाफी करणार आहेत का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
आठवड्याच्या कामकाजात विरोधी पक्ष काय आहे ते त्यांना दिसेल
उद्यापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सर्वच पक्षाचे आमदार नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे देखील नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. विरोधीपक्ष दिशाहीन झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला देखील आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. विरोधी पक्ष दिशाहीन झाला आहे असं वाटत असेल तर एका आठवड्याच्या कामकाजात विरोधी पक्ष काय आहे ते त्यांना दिसेल असे आदित्य ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे कामकाजात सहभागी होणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे हे इंडिगो विमानाने येत नाहीत हे तुम्हाला आणि आम्हाला चांगलं माहिती आहे. ते ज्या विमानाने फिरतात त्याला यायला काही अडचणी नाहीत. आणि जर ते ही नाही वाटलं तर, शिंदे साहेब आणि मी समृद्धी महामार्ग बनवला आहे. वाटलं तर गाडी पाठवून देतो असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. यावरे देखील आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री स्वतः दोन चार्टर फ्लाईट करून आले आहेत. या सगळ्या गोष्टीत त्यांनी जाऊ नये. काढायला गेलं तर खूप काही निघू शकतं असे आदित्य ठाकरे म्हणाले.
इंडिगो सेवा ठप्प झाल्यामुळं कितीतरी लोकांचे हाल झाले
आम्हाला सुदैवाने दुसरे विमान मिळाले, मात्र देशभरात अनेक लोक महत्त्वाच्या ठिकाणी जाऊ शकले नाही. त्याचा फटका, इंडिगोला नोटीस पाठवली आहे. मात्र संबंधित मंत्री याला जबाबदार नाही का? नियमावली तोडली जात आहे. केंद्र सरकारने यावर उत्तर दिले पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले. आमच्यासारखे लोक येऊ शकता, पण कितीतरी लोकांचे हाल कालपासून झालेले आहेत. बोलायला ठीक आहे मात्र एव्हेशन सेक्टर 2014 पूर्वी चांगलं होतं. मात्र त्यानंतर यात मोनोपॉली यायला लागलेली आहे. याचा अभ्यास झाला पाहिजे. नवीन एअरपोर्टवर हजारो कोटीचा खर्च झालेला आहे .मात्र आता ते बंद आहेत असे आदित्य ठाकरे म्हणाले.
जसे उद्योग गुजरातला पळवले जातात तसे पर्यटनही पळवण्याचा प्रयत्न सुरु
आमची इच्छा आहे हा वाद वाढू नये. पण भाजपने जर वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे उत्तर दिले जाईल असे आदित्य ठाकरे म्हणासे. स्वतः काही करण्याची भाजपची हिंमत नाही. बोर्ड लावण्याचा प्रयत्न करतात. महानगरपालिका हॉटेल्स इंडस्ट्री त्यांना दमदाटी केली जात आहे. येणारे पर्यटन देखील भाजप घालवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात करत आहे. जशी उद्योग गुजरातला पळवले तसे पर्यटन हे पळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.
सत्ताधारी भाजपचा पक्ष अनाकोंडा
तुमच्याकडे सत्ताधारी म्हणून संख्याबळ पण आहे. तुम्ही दोन (उपमुख्यमंत्री) पद हे बोगस पद कशाला निर्माण केले? असा सवालही आदित्य ठाकरेंनी केला. सत्ताधारी भाजपचा पक्ष अनाकोंडा आणि दोन विषारी साप यांची वृत्ती यावरुन दिसून येते. सगळं काही हडपायचं, आम्ही पदासाठी भांडत नाही आहे.लोकशाहीमध्ये जे पद असायला पाहिजे त्यासाठी भांडत आहे. यांनी दोन खोटी पद निर्माण केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली.