मुंबई : मुंबईप्रमाणे नागपुरातही स्वस्त दरात घरे मिळणार आहेत. विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एनएमआरडीएच्या बैठकीत एक हजार 812 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली.
या बैठकीला नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूरचे आमदार उपस्थित होते. 2018-19 सालासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या एक हजार 812 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
या वर्षात रिंग रोड जंक्शनवर लॉजिस्टिक पार्क उभारणे, विभागीय कार्यालयांची स्थापना, कचऱ्यापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प उभारणे, महानगर क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरं उपलब्ध करुन देणे, कामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर उभारणे, स्वदेश योजनेअंतर्गत दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसचा विकास, श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाचा विकास यासारख्या प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
याचबरोबर फुटाळा तलाव परिसराचे सुशोभिकरण करणे, अनधिकृत बांधकामे नियमित करुन घेण्यास मुदतवाढ देणे यासारख्या विविध विषयांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
नागपूर महानगर विकास प्राधिकरणाने आपल्या क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत किमान 1 लाख घरे बांधण्याचे नियोजन करावं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच या क्षेत्रातील आरक्षित भूखंडावर लक्ष ठेवण्यासाठी 'एमआरएसएसी'ची मदत घेऊन यंत्रणा उभी करावी, तसंच या भूखंडांवरील अनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदारी द्यावी, असंही फडणवीसांनी सांगितलं.
प्राधिकरणाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सुधार योजनेतील विविध विकास कामे (70 कोटी), रस्ते व पुलांची कामे (40 कोटी), सांडपाणी व्यवस्थापन (10 कोटी), फुटाळा तलाव येथे संगीत कारंजे व अंबाझरी उद्यान येथे मल्टिमीडिया शो उभारणे (30 कोटी), शासकीय व प्राधिकरणाच्या सहयोगाने श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी तीर्थस्थळाचा विकास (122 कोटी), प्राधिकरणाच्या तरतुदीतून श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानचा विकासासाठी (26 कोटी), चिंचोली येथील शांतीवनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक वापराच्या वस्तूचे जतन व संवर्धनासाठी संग्रहालयाच्या आधुनिकीकरण करणे (28.25 कोटी), स्वदेश योजनेअंतर्गत दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेसचा विकास (30 कोटी), ड्रॅगन पॅलेस परिसरात मूलभूत सुविधा उभारणे (20 कोटी), अल्प उत्पन्न गटासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर बांधणी (700 कोटी), उत्तर नागपूरमधील कामठी रोडवर डॉ. बाबासाहेब आंबेडर कन्व्हेंशन सेंटर उभारणे (89.64 कोटी) आदी विविध विकास कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईप्रमाणे नागपुरातही स्वस्त घरं, राज्य सरकारची भेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Mar 2018 08:32 PM (IST)
2018-19 सालासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)च्या एक हजार 812 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -