नागपूर : खंडणीसाठी अपहरण झालेल्या लॉटरी व्यापाऱ्याची हत्या झाल्याचा संशय आहे. बुटीबोरी पोलिस स्टेशनअंतर्गत पेटीचुहा शिवारात एक जळालेला मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह राहुल आग्रेकर यांचा असण्याची शक्यता वर्तवला जात आहे.

मात्र, हा मृतदेह राहुल आग्रेकर यांचा नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. ज्या बोलेरो जीपमध्ये अपहरणकर्ते राहुल आग्रेकरांना घेऊन गेले होते, ती गाडी नागपूर-कामटी मार्गावर सापडली आहे. परंतु आरोपी मात्र अजूनही पसार आहेत.

व्यापारी राहुल आग्रेकर (वय 34 वर्षे) यांचं एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं. आग्रेकर यांच्या दोन मित्रांवर पोलिसांना संशय आहे, जे गायब आहेत.

नागपुरात एक कोटींच्या खंडणीसाठी लॉटरी व्यापाऱ्याचं अपहरण

राहुल आग्रेकरांच्या फोनवरुनच अपहरणाची धमकी
राहुल आग्रेकर 21 नोव्हेंबरला सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास दारोडकर चौक परिसरातील त्यांच्या घरातून निघाले. एक ते दीड तासात परत येतो, असं त्यांनी कुटुंबीयांना सांगितलं. मात्र, ते दुपारपर्यंत परतले नाही. दुपारी राहुल यांच्याच फोनवरुन आग्रेकर कुटुंबीयांना राहुल यांचं अपहरण केलं आहे, त्याच्या सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी द्या, अशी मागणी करणारा फोन आला.

आग्रेकर कुटुंबीय घाबरले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना माहिती दिली नाही. मात्र, संध्याकाळी त्यांनी लकडगंज पोलीस स्टेशन गाठून राहुल बेपत्ता असून खंडणीसाठी फोन आल्याची माहिती पोलिसांना दिली. तेव्हापासून पोलिसांच्या अनेक पथकांनी राहुल आग्रेकर यांच्या शोधासाठी खूप प्रयत्न केले. मात्र अद्यापपर्यंत यश आलेलं नाही.

दरम्यान काल रात्रीपासून राहुल यांचा मोबाईल, ज्याच्यावरून अपहरणकर्ते संपर्क साधत होते. तो फोन बंद आहे. त्यामुळे आग्रेकर कुटुंबीयांची काळजी वाढली आहे. राहुल घरातून निघाल्यानंतर घरापासून काही अंतरावर एका बुलेरो जीपमध्ये बसून ते गेल्याचं परिसरातील काही नागरिकांनी पोलिसांना सांगितलं आहे.