Nagpur News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (government medical college nagpur) व रुग्णालयातील वसतिगृहांचे काम रखडल्याने निवासी डॉक्टरांच्या (Resident Doctors) निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जुन्या वसतीगृहांची अवस्था आणि उपलब्ध खोल्यांची संख्या मर्यादित असतानाच दरवर्षी पदव्युत्तरच्या जागा मात्र वाढत आहेत. अशा स्थितीत प्रवेश घेणाऱ्या निवासी डॉक्टरांना निवाऱ्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स मिळून निवासी डॉक्टरांची एकूण संख्या 572 आहे. मार्डसाठी (Maharashtra State Association of Resident Doctors) सहा क्रमांकाचे वसतीगृह आणि सुपरच्या निवासी डॉक्टरांसाठी 27 खोल्यांचे वसतिगृह आहे. मात्र, आता ही वसतीगृहे अपूरी ठरली आहेत.
एका खोलीत 3 डॉक्टरांना राहावे लागत असल्याची स्थिती आहे. मार्ड वसतीगृहाची इमारत जुनी झाल्याने जीर्ण होत चालली आहे. यासोबतच गटारांसह अन्य समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. गतवर्षी तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री (Minister of Medical Education) जितेंद्र आव्हाड यांनी नागपूर दौऱ्यावर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी नवीन इमारतीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अधिष्ठातांना दिले होते. वैद्यकीय बांधकाम समितीने वसतीगृहाची पाहणी करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. सततच्या पाठपुराव्यानंतर निवासी डॉक्टरांसाठी चार मजली इमारतीत 250 खोल्यांची व्यवस्था करण्याचे नियोजन सरकारने केले होते.
नियोजित नवीन वसतीगृहाबद्दल...
- 250 खोल्यांचे नवे वसतीगृह
- 28 कोटींचा निधी मंजूर
- 2020 मध्येच अपेक्षित होते हस्तांतरण
निधी मंजूर तरीही कामांना 'ब्रेक'
वसतीगृहासाठी 28 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या पश्चिम भागात वसतिगृहाच्या बांधकामासाठी जागाही निश्चित करण्यात आली होती. निधीचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर बांधकामालाही सुरुवात झाली. मार्च 2020 पर्यंत ही इमारत तयार होऊन हस्तांतरित होणे अपेक्षित होते. परंतु, 2019 मध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे बांधकामाला ब्रेक लागला. तेव्हापासून काम रखडले आहे. बांधकामासाठी 7 कोटींहून अधिक खर्च झाला आहे. मार्च 2022 मध्ये इमारतीचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, अद्यापपर्यंत इमारत अपूर्ण आहे. दरवर्षी पदव्युत्तरच्या जागा वाढत आहेत. नुकतेच नवीन जागांना मंजुरी देण्यात आली आहे. या स्थितीत नवीन निवासी डॉक्टरांच्या राहण्याचा प्रश्न गंभीर ठरला आहे. इमारतीचे बांधकाम केव्हा पूर्ण होणार, हे बांधकाम विभागही सांगण्यास तयार नाही. निधी न मिळाल्याचे कारण सांगितले जात आहे, मात्र इमारत बांधकामासाठी यापूर्वीच निधी मंजूर असताना आता निधीअभावी हा विषयच उद्भवत नाही.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI