Nagpur Madgaon Express : कोकणाला विदर्भाशी जोडणारी नागपूर मडगाव एक्सप्रेस उद्या म्हणजे 4 जानेवारीपासून शेगाव ( Shegaon) येथे थांबणार आहे. या एक्सप्रेसला शेगाव थांबा मिळावा यासाठी पनवेल प्रवासी संघ गेली चा वर्षे पाठपुरावा करत होता. पनवेल प्रवासी संघाच्या मागणीला यश मिळाल्याने कोकण किनारपट्टीतील श्री संत गजानन महाराज यांच्या भक्त संप्रदायामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण पाहायला मिळते आहे.
 
मडगाव ते नागपूर एक्सप्रेस ( क्रमांक 01139 ) आणि परतीच्या मार्गावरील नागपूर मडगाव एक्सप्रेस ( क्रमांक 01140 ) उद्यापासून म्हणजे 4 जानेवारीपासून शेगाव येथे थांबा घेणार आहे. बुधवारी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी नागपूर येथून सुटणारी ही गाडी साधारण साडेसात वाजता शेगाव रेल्वे स्टेशनवर पहिल्यांदाच थांबा घेईल. पनवेल परिसरातील भक्तगण यांना देखील शेगाव येथे जाण्यासाठी ही गाडी अत्यंत सोयीची ठरणार आहे. मडगाव येथून रात्री आठ वाजता सुटणारी गाडी सकाळी सात वाजता पनवेल येथे पोहोचेल. सकाळी 7.05 वाजता पनवेल स्थानक येथून प्रस्थान करणारी गाडी दुपारी साडेतीन वाजता शेगाव येथे पोहोचेल. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येते. प्रत्येक आठवड्यातील बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी नागपूर येथून सुटेल तर प्रत्येक गुरुवारी आणि रविवारी ही गाडी मडगाव येथून सुटेल.
 
या एक्सप्रेस गाडीचे शेगावसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन  आरक्षण देखील सुरू झालेले आहे. श्री दत्त महाराज संप्रदायातील गजानन महाराज यांची संजीवन समाधी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आहे. या समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातील भाविक शेगाव येथे येत असतात. कोकणपट्टीतील नागरिकांना शेगावला जाण्यासाठी थेट एक्सप्रेस गाड्या उपलब्ध नाहीत. पर्यायाने त्यांना मुंबई, ठाणा, कल्याण इथपर्यंत प्रवास करून दुसऱ्या गाडीने जावे लागते. विदर्भ आणि कोकण किनारपट्टी यांना जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी मडगाव नागपूर एक्सप्रेस शेगाव या ठिकाणी थांबली पाहिजे या स्वरूपाची मागणी पनवेल प्रवासी संघाने लावून धरली होती.
 
"आमच्या मागणीला मान्यता मिळाली याचे समाधान तर आहेच पण त्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक समाधान या गोष्टीचे आहे की आता कोकण किनारपट्टीतील श्रीसंत गजानन महाराज यांच्या भक्तगणांना थेट शेगाव येथे जाण्याची सुविधा निर्माण झाली आहे, अशा भावना पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे यांनी व्यक्त केल्या आहेत.