Nagpur News : नागपुरातील चिखली परिसरातील आठ महिन्याच्या चिमुकल्याचे अपहरण करणारे प्रजापती दाम्पत्य मुलांच्या खरेदी-विक्रीत अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. नात्याला काळिमा फासणारे कृत्य म्हणजे आरोपी प्रजापतीने स्वतःच्या मुलाचीही 25 हजारांत विक्री केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणातही पोलिसांनी (Nagpur Police) चौघांविरोधात नव्याने गुन्हा दाखल केला आहे.
आठ महिन्याच्या चिमुकल्याच्या विक्री प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपी योगेंद्र प्रजापतीची कसून चौकशी सुरु केली. त्याने चौकशीदरम्यान छत्तीसगडमधील दाम्पत्याला स्वतःच्याच मुलाची विक्री केल्याची बाब कबूल केली. जून 2022मध्येच या संदर्भातील सौदा झाला होता. त्यावेळी दोघेही पती-पत्नी राजनांदगाव येथे आश्रयाला होते. त्याची पत्नी पाचव्यांदा गरोदर असताना तिला भंडारा (Bhandara) येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यावेळी तेथे एक महिला देखील भरती होती. त्यावेळी महिलेल्या एका सुरेंद्र मेश्राम नावाच्या नातेवाईकासोबत प्रजापतीची ओळख झाली. मेश्रामशी बोलत असताना स्वतःला चार मुले असल्याची माहिती प्रजापतीने दिली. मेश्रामने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि एकही मूल नसल्याने एक मूल देण्याची विनंती केली. याबदल्यात 25 हजार रुपये देण्याची तयारी दाखविली. प्रजापतीने सनी या एक वर्षाच्या मुलाची मेश्राम दाम्पत्याला विक्री केली.
या प्रकरणात पोलिसांनी प्रजापती दाम्पत्याविरोधात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय मुलाची खरेदी करणाऱ्या राजनांदगाव येथील मेश्राम दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून 'या' दिशेने तपास...
आरोपी प्रजापतीचे 2017 मध्ये पिता डोंगरे हिच्यासोबत विवाह झाले होते. पाच वर्षातच त्यांना पाच मुले-मुली झाले. पोलिसांना यावर विश्वास बसणे कठीण झाले आहे. राजनांदगावमध्ये विक्री केलेला मुलगा स्वतःचा असल्याचा दावा प्रजापती करत असला तरी तो खरोखरच त्याचा मुलगा आहे का याचा देखील पोलीस तपास करत आहेत.
राजनांदगाव 'कनेक्शन'
रुग्णालयातून बाहेर निघाल्यानंतर प्रजापती दाम्पत्याने राजनांदगाव येथील छुरिया तालुक्यातील बागनदी या गावात जाऊन मेश्राम दाम्पत्याची भेट घेतली. तेथे ते आठवडाभर राहिले. या संदर्भातील दत्तकपत्र प्रजापतीने तयार केले आणि नोटरी केले, अशी माहिती त्याने दिली. पोलिसांनी दत्तकपत्राची पाहणी केली असता प्रजापतीचे स्वतःचे नाव प्रभूलाल ठलाल आणि पत्नीचे नाव रिटा ठलाल असे लिहिल्याची बाब समोर आली. त्याने खोटे नाव देत दत्तक प्रक्रियेचे दस्तावेज तयार केले होते.
ही बातमी देखील वाचा