Nagpur Gosekhurd Project : गोसेखुर्द मधील बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेलेल्या जमिनी आणि भ्रष्टाचारामुळं मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची व्यथा एबीपी माझाने समोर आणली होती. त्याची दखल आता सरकारनंघेतली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. भाजप आमदार परिणय फुके यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
एबीपी माझा ने उचलून धरलेल्या गोसीखुर्द मधील बॅक वॉटरमुळे बाधित शेतकऱ्यांच्या अधिग्रहण प्रक्रियेतील कथित घोटाळ्याच्या बातमीची दखल सरकारने घेतली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात चौकशीचे आदेश देत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्याची माहिती भाजप आमदार परिणय फुके यांनी दिली आहे. बुडीत जमिनीचे अधिग्रहण प्रक्रियेत जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोपही परिणय फुके यांनी केला आहे. या संदर्भातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी माझ्यापर्यंतही पोहोचल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि योग्य शेतकऱ्यांचीच जमीन अधिग्रहित होऊन मोबदला देण्यात यावा अशी मागणीही फुके यांनी केली आहे. एबीपी माझा ने या बातमीच्या माध्यमातून गोसेखुर्दच्या बॅकवॉटरमुळे बाधित शेतकऱ्यांची व्यथा समोर आणल्याचे फुके म्हणाले.
नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंचन सुविधा देण्याच्या उद्देशाने प्रकल्पाची निर्मिती
नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंचन सुविधा देण्याच्या उद्देशाने इंदिरासागर धरणाची स्थापना गोसेखुर्द प्रकल्प म्हणून करण्यात आली. गोसीखुर्द सिंचन प्रकल्प ज्याला इंदिरा सागर सिंचन प्रकल्प म्हणूनही ओळखले जाते. हा प्रकल्प वैनगंगा नदीवरील भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील गोदावरी खोऱ्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८४ मध्ये ७ व्या पंचवार्षिक योजनेत सुरू केला होता. भारत सरकारकडून त्याला राष्ट्रीय सिंचन प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. या धरणाची उंची २२.५ मीटर आणि ११,३५० मीटर लांबी आहे. गोसीखुर्दच्या पाण्याने प्रभावित होणाऱ्या सुमारे २४९ गावांचे पुनर्वसनानंतर हे प्रकल्प तयार करण्यात आले होते. या प्रकल्पासाठी भंडारा जिल्ह्यातील १०४ गावांचे, नागपूर जिल्ह्यातील ८५ गावांचे तर चंद्रपूर जिल्ह्यातील ११ गावांचे पुनर्वसन करण्यात आले होते. गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यातील गावांजवळ (तालुका-पवनी, जिल्हा-भंडारा) वैनगंगा नदीवर सुमारे ११.३५ किमी लांबीचे धरण बांधण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या: