Nagpur Fire Accident : नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील चिपडी येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. या भागात असलेल्या कल्पना जिनिंगला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत जिनिंगमधील कापूस व इतर साहित्य जळाल्याने कोट्यवधींचे आर्थिक नुकसान झाले आहे. दुर्दैवाने, या घटनेत एक बालक भाजल्याने गंभीर जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Continues below advertisement

Nagpur Fire Accident : काही क्षणातच आगीचं रौद्ररूप; कोट्यवधींचे आर्थिक नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास जिनिंगमध्ये अचानक धूर निघू लागला. कापूस खुल्या मैदानात असल्याने वाऱ्याच्या वेगाने काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले. जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा असल्याने आगीने संपूर्ण परिसराला कवेत घेतले. आगीच्या ज्वाळा लांबून दिसत नसल्या तरी आतून कापूस जळत होता. त्याचा धूर आसमंतात दिसून येत होता. ज्यामुळे कामगारांची आणि स्थानिक नागरिकांची मोठी धावपळ उडाली.

Continues below advertisement

Fire Accident : आगीच्या झळा लागल्याने चिमुकला जखमी, पहाटेपर्यंत आगेवर पूर्ण नियंत्रण

दरम्यान, आग लागली तेव्हा परिसरात खेळत असलेला रोहन सुरेश दुधवे (वय ३) हा बालक आगीच्या झळा लागल्याने जखमी झाला. त्याला लागलीच कुही येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर नागपूर मेडिकल इस्पितळात उपचारार्थ रवाना केले. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजले. अशातच आग विझविण्यासाठी उमरेड, मौदा व कुही येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलाविण्यात आल्या. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. पहाटेपर्यंत आगेवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले. दरम्यान या भीषण आगीच्या घटनेत कोट्यवधीचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

Akola Fire Accident : अकोलाच्या अडगाव बुज्रुग गावात एका घराला भीषण आग, आगीत 2 जण ठार

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या अडगाव बुज्रुग गावात एका घराला भीषण आग लागली. या आगीत 2 जण ठार झाले असून एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. मृतकात एका लहान मुलाचा समावेश आहे. आग लागलेली असतांना अचानकपणे सिलेंडरचा स्फ़ोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं. या घरात ज्वलनशील पदार्थ डिझेलचा साठा साठवून ठेवला होता, त्यामुळेच स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज घटनास्थळी वर्तविला जात होता.

दरम्यान, परिसरातील ग्रामस्थांकडून आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होते. दरम्यान बराच वेळ घरातील काही सदस्य घरात अडकून होते. तर काहींना घराबाहेर काढण्यात काही वेळात यश आलं. या जखमीना अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय.

इतर महत्वाच्या बातम्या