नागपूर : नागपूरच्या कुही गावातील स्वयंघोषित गोरक्षकाकडून गायींची विटंबना सुरु आहे. इथल्या गोशाळेत जवळपास 100 गायी मरणासन्न अवस्थेत जगत आहेत. धक्कादायक म्हणजे मेलेल्या गायींची थेट तलावात विल्हेवाट लावली जात असल्याचं समोर आलं आहे.


 

बजरंग दलाचा माजी नेता आणि गोहत्या निवारक प्रचार समितीचा संचालक दत्तूराम जिभकाटेने गोरक्षण नावाचा ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टच्या नावाखाली त्याने अडीच एकर सरकारी जमिनीवर अतिक्रमणही केलं. मात्र आरोग्य आणि चारा-पाण्याच्या समस्येमुळे या गोशाळेत गायी मृत्यूच्या दारात उभ्या आहेत.



जवळपास 160 गायी असलेल्या या गोशाळेत आतापर्यंत 30 ते 35 गायी दगावल्या आहे. या गोशाळेत गायींची निगा राखली जात नाही. महत्त्वाचं म्हणजे गायींची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना तलावात फेकलं जातं आहे. यामुळे सोडवलेल्या गायींबाबत सरकारच्या गोहत्या प्रतिबंधक कायद्याच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचं समोर आलं आहे.

 

दरम्यान, 1989 पासून गोसेवेचा आणि गोहत्या निवारण संस्थेच्या माध्यामातून हत्येसाठी नेणाऱ्या गायी या गोशाळेत आणतो, असा दावा दत्तूराम जिभकाटेने केला आहे. परंतु गायीला गोमाता म्हणवणाऱ्यांचा भंपकपणा मन सुन्न करणारा आहे.