मुंबई: राज्यातील 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायती निवडणुकीत अनेक ठिकाणी विद्यमान सत्ताधीशांना पायउतार व्हावे लागले आहे. तर अनेक ठिकाणी दिग्गजांना आपली सत्ता कायम राखण्यात यश आले आहे. या निवडणुकीत 22 नगरपालिकेत भाजप, 21 नगरपालिकेत काँग्रेस, 18 नगरपालिकांध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, 15 नगरपालिकेत शिवसेना, 12 नगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर 26 नगरपालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती पाहायला मिळत आहे.


या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष हा जनतेतून निवडायचे असल्याने सर्वच पक्षांना आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार द्यावा लागला होता. या नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपचे 55, शिवसेनेचे 23, काँग्रेसचे 21 तर अपक्ष 25 उमेदवार निवडून आले आहेत.

या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला असला, तरी सर्वच पक्षांना कुठे पराभव, तर कुठे विजयाची चव चाखायला मिळाली. विभागनिहाय चित्र पाहिले, तर कुणाचे कुठे काय घडले, काय बिघडले हे चित्र स्पष्ट दिसते.

पश्चिम महाराष्ट्र

  1. सातारा नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या उदयनराजेंनी गड राखला, काँग्रेसच्या शिवेंद्रराजेंचा पराभव



  1. कराडमध्ये पृथ्वीराजबाबांनी नगरपालिका जिंकली, नगराध्यक्ष मात्र भाजपचा



  1. म्हसवडमध्ये महादेव जानकर यांच्या रासपला तुषार वीरकर यांच्या रुपानं पहिला नगराध्यक्ष मिळाला



  1. इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांना धक्का बसला आहे. इस्लामपूर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाला आहे.



  1. संगमनेर जिंकून बाळासाहेब थोरातांनी आपला गड राखला आहे



  1. राहात्यामध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंना धक्का असून पालिका गमावावी लागली आहे


 

मराठवाडा

  1. परळीत पंकजा मुंडेचा दारुण पराभव झाला असून, भाऊ धनंजयनं नगरपालिका जिंकली आहे



  1. भोकरदनमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना धक्का बसला आहे. दानवेंना भोकरदन नगरपालिका गमावावी लागली आहे.



  1. कळमनुरी नगरपालिकेत खा. राजीव सातव यांनाही धक्का बसला आहे, काँग्रेसचा पराभव करुन शिवसेनेने कळमनुरी नगरपालिकेवर भगवा फडकवला आहे.


 

कोकण

  1. राणेंचे होमग्राऊंड असलेल्या मालवणमध्ये काँग्रेसला नगरपालिका गमावावी लागली आहे. येथे शिवसेनेने राडेंचा पाडाव करुन सत्ता हस्तगत केली आहे.



  1. सावंतवाडीमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हातात असल्या तरी नगराध्यक्ष शिवसेनेचा निवडून आला आहे.



  1. देवडमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता मिळवली असून, नगराध्यक्षसुद्धा काँग्रेसचाच विराजमान होणार आहे.



  1. रोह्यात काका-पुतण्याच्या लढाईत सुनील तटकरेंचा मोठा विजय झाला आहे. तटकरेंचे पुतणे संदीप तटकरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे.


 

विदर्भ

  1. यवतमाळच्या दारव्हामध्ये माणिकराव ठाकरेंना धक्का बसला आहे. येथे शिवसेनेच्या हाती सत्ता गेली आहे.



  1. खामगावमध्ये दिलीप सानंदा यांचा पराभव झाला असून, सत्तेच्या चाव्या फुंडकरांच्या हातात आहेत.



  1. शेगाव नगरपालिकेत एमआयएमचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत.


 

उत्तर महाराष्ट्र

  1.  नाशिकमधील 6 पैकी चार जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

  2.  नाशिकमधील नांदगाव, मनमाड, भगूर, सिन्नर नगरपालिकेत शिवसेनेने सत्ता हस्तगत केली आहे.

  3.  या निवडणुकीत छगन भुजबळ प्रचारात नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची अनेक ठिकाणी पिछेहाट झाली आहे.

  4.  जळगावमध्ये 12 पैकी भाजपला 6 पालिकेवर,तर 3 ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एकही पालिका हाती लागली नाही.

  5.  धुळे दोंडाईमध्ये पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी गड राखला असून त्यांच्या मातोश्री नयनकुँवरताई सरकारसाहेब रावल नगराध्यक्षपदाच्या लढतीत विजयी झाल्या आहेत.

  6.  शिरपूरमध्ये काँग्रेसचे अंबरीश पटेल यांचा वरचष्मा कायम आहे.