मुंबई: राज्यातील 147 नगरपालिका आणि 18 नगरपंचायती निवडणुकांचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. या सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अनेक ठिकाणी विविध पक्षातील नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. काही ठिकाणी तर नेत्यांच्या साम्राज्याला कुटुंबीयांनीच आव्हान दिले होते. यामध्ये अनेक ठिकाणी दिग्गजांना आपले गड राखण्यात यश आले असले, तरी बऱ्याच ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.


मंत्री लोणीकरांना धक्का

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पत्नी मंदाताई यांना परतूर नगरपालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या सातारा नगरपालिकेत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांनाही पराभवाचा सहन करावा लागला आहे.

रावल-देशमुख लढाईत रावलांची सरशी

रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री राजकुमार रावल यांनीही धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेसाठी शहरात तंबू ठोकला होता. दोंडाईचा नगरपालिकेची सत्ता मिळविण्यासाठी रावल यांनी आपल्या मातोश्री नयनकुँवरताई सरकारसाहेब रावल यांना नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उभे केले होते. त्यांच्याविरोधात माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांचे भाऊ रवींद्र देशमुख हे उभे होते. पण रवींद्र देशमुखांना धुळ चारत राजकुमार रावल यांच्या मातोश्री विजयी झाल्या आहेत.

भाऊबंदकीचे हादरे

नगरपालिकेच्या निवडणुकीत भाऊबंदकीने राज्यातील बड्या नेत्यांना हादरे दिले होते. या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या परळी नगरपालिकेसाठी 'माता विरुद्ध नेता' सामना रंगला होता. भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे समोरासमोर उभे होते. पण तिथे मातेचा पराभव झाला असून नेत्याचा विजय झाला आहे.

काकाचीच सरशी

दुसरीकडे बीडमध्येही जयदत्त क्षीरसागर यांना भाऊबंदकीने आव्हान दिले होते. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पुतण्या संदीप याने चुलत्यांच्या सवतासुभा उभा केला होता. पण यात जयदत्त क्षीरसागर यांनी आपली सत्ता कायम राखली आहे. तर कोकणातील रोह्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा पुतण्या संदीप तटकरे याने शिवसेनेत प्रवेश करून रोह्यातील काकाच्या साम्राज्याला आव्हान दिले होते. पण येथेही काकाचीच सरशी झाली असून संदीप तटकरेचा पराभव झाला आहे.

भावाने भावाला हारवले

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. राजुरा नगरपालिकेसाठी भाजपचे आमदार संजय धोटे यांचे भाऊ सतीश धोटे निवडणूक लढवीत होते. त्यांच्या विरोधात काँग्रेसने अरुण धोटे यांना निवडणुक रिंगणात उतरवले होते. पण संजय धोटे यांना पराभव सहन करावा लागला असून, त्यांचे बंधू अरुण धोटे विजयी झाले आहेत.

पत्नीने राखली शान

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसकळे यांच्या विरोधात त्यांचे दीर सुधाकर भारसाकळे ही लढत लक्षवेधी होती. पण या निवडणुकीत प्रकाश भारसाकळे यांनी आपला गड शाबूत राखला आहे. प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाखळे विजयी झाल्या आहेत. यवतमाळमध्ये विधान परिषदेचे आमदार संदीप बाजोरिया यांनी 'काँग्रेसमुक्त यवतमाळ' करण्याचे आवाहन यवतमाळमधील जनतेला केले होते. यवतमाळमधील माजी मंत्री मनोहर नाईक यांचे राजकारण संपवण्याची शपथ बाजोरिया यांनी घेतली होती. पण मनोहर नाईक यांना आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळाले आहे. नाईक यांच्या पत्नी अनिता नाईक या पुसद नगरपालिकेत निवडून आल्या आहेत.

अमरिश पटेलांचा वरचष्मा

त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातील विधानपरिषदचे आमदार अमरीश पटेल यांनीही आपले वर्चस्व कायम राखले असून, त्यांच्या पत्नी जयश्रीबेन शिरपूर येथून नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांच्या पत्नी अनिता चौधरींना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पत्नी पुष्पलता पाटील विजयी झाल्या आहेत. संगमनेरमध्ये विधानपरिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी दुर्गा याही विजयी झाल्या आहेत. दुर्गा तांबे या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बहीण असल्याने थोरात यांनीही त्यांच्या प्रचारासाठी कष्ट घेतले होते.