अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून संवाद साधला. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अण्णांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी अण्णांनी अनेक वेळा मला तुरुंगात टाकून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. आतापर्यंत मला तब्बल बारा वेळा हत्येच्या धमकी आल्याचा गौप्यस्फोट अण्णांनी केला.
यावेळी अण्णांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समाचार घेतला. पंतप्रधानांनी निवडणुकीत तीस दिवसात काळा पैसा आणण्याचं अश्वासन दिलं होतं. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार असल्याचं सांगितलं. मात्र तीन वर्षांत पंधरा रुपये सुद्धा आले नसल्याचा आरोप अण्णांनी केला.
आशिया खंडात भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर भारत आहे. तर सरकार भ्रष्टाचारमुक्तीचं अवाहन करुन करोडोंच्या जाहिराती करतंय. मात्र भ्रष्टाचार रोखणारं लोकपाल बिल कमकुवत करत असल्याचा आरोप अण्णांनी केला.
गेल्या 40 वर्षांपासून समाज आणि देशासाठी आंदोलन करतोय. कोणत्याही पक्षाच्या विरोधात माझी भूमिका नाही. मात्र तरीही राजकीय पक्षांना माझी भूमिका रुचत नसल्याचं अण्णांनी म्हटलं.
आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचा माझ्या मनात विचार आला नाही. मात्र मला राजकारणात आणण्याचा प्रयत्न झाल्याचं अण्णांनी म्हटलं.
राजकारणात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्तेचं समीकरण असल्याचा आरोप अण्णांनी केला.
त्याचबरोबर, देशाला बाधा पोहचवणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा अण्णांनी दिला. देशाच्या विकासासाठी मी ८० वर्षाचा युवक बनून लढणार असल्याचंही अण्णांनी म्हटलं.