बुलढाणा : बापानेच मुलाची हत्या केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात रविवारी पहाटे समोर आली आहे. हत्येचं कारणही तितकच क्षुल्लक आहे. महिन्याभरापूर्वी मामासोबत झालेल्या भांडणात मुलाने मामाची बाजू घेतल्याने त्याचा वचपा घेण्यासाठीच आपणच मुलाला यम सदनी धाडल्याची धक्कादायक कबुली बापाने दिलीय. पोलिासांनी आरोपी पित्याला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे. 


शेगाव शहरातील गरीब नवाज मस्जिदमध्ये पहाटे 5 वाजेच्या सुमारास अजान देण्याकरिता सय्यद वली सय्यद मेहबुब हे गेले असता मस्जिदमधील एका रूममध्ये एक युवक त्यांना दिसून आला. सय्यद वली यांनी त्याला दोन इतर नागरिकांच्या मदतीने उठवण्याचे प्रयत्न केले असता तो मृत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. सदर युवकाची ओळख मोहम्मद सलीम शैख कासम राहणार खमु जमदार नगर शेगाव अशी झाल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. 


दरम्यान या प्रकरणात मृतकाच्या बापावरच शंका व्यक्त केल्याने व तशी तक्रार पोलिसात दिल्याने आरोपी शेख कासम शेख गफूर वय 43 वर्ष याला पोलिसांना ताब्यात घेतलं. त्यानंतर चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. यात त्याने सांगितले की, महिनाभरापूर्वी मामासोबत झालेल्या भांडणात मुलाने मामाची बाजू घेतली होती. मुलीच्या लग्नासाठी पैसे जमा केलेल्या पैशातून आपण 3 हजार रुपये मागितले होते, मात्र मुलगा सलीम याने पैसे देण्यास नकार दिला होता. त्यामुळे आपण त्याची हत्या केल्याचे शेख कासम शेख गफूरने कबूल केलं.