नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पुन्हा एकदा कायद्याचे तीनतेरा वाजले आहेत. नागपूरच्या रामनगर भागात व्यावसायिकाची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. रामनगरच्या शिवमंदिरासमोरच काही गुंडांनी कुशल कुहिके या 38 वर्षीय व्यावसायिकाची दिवसाढवळ्या हत्या केली आहे.
डेकोरेशन व्यावसायिक असलेले कुशल कुहिके आपल्या बुलेट गाडीवर लहान मुलीसाठी दूध घ्यायला रामनगर भागात होते. यावेळी गुंडांच्या एका टोळीने त्यांचा रस्ता रोखला आणि डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर धारदार शस्त्रांनी गुंडांनी कुशल यांच्या धडापासून शीर वेगळं केलं. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली. स्थानिक व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली.
दरम्यान या हत्येनंतर व्यावसायिकाच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शनं करत त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. पूर्ववैमनस्यांतून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. काही संशयित आमच्या नजरेत असून आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आलाय.
नागपुरात हिवाळी अधिवशेन सुरु असताना 24 तासात 6 जणांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. तेव्हा मरारटोली भागात निलेश कवरत्ती या युवकाची हत्या करण्यात आली होती. त्याच हत्येचा सूड म्हणून आजची हत्या करण्यात आल्याचा बोललं जात आहे.